पिंपरी : फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे नाराज झाल्याने एकाला बेदम मारहाण करण्यात आली, तर एकाने ‘सुसाइड नोट’ची पोस्ट फेसबुकवर टाकून पोलीस यंत्रणेला कामाला लावले. हे दोन्ही प्रकार ‘सोशल मीडिया’च्या चुकीच्या वापरामुळे घडले. सोशल मीडियाचा काही जण चुकीचा वापर करतात. मात्र, यामुळे पोलिसांचा अधिकच ताप वाढत चालला आहे. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे यापूर्वीही समाजात तणाव निर्माण झाले असून, आता तर वैयक्तिक मारहाणीच्या घटना घडू लागल्या आहेत. शहरात गेल्या दोन दिवसांत फेसबुकवर कॉमेंट केल्याने दोन मोठ्या घटना घडल्याचे समोर आले. घटना घडल्यानंतर त्यावर विचार करण्याऐवजी त्यापूर्वीच या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी पावले उचलावीत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. पूर्वी इंटरनेट चालवायचे म्हटले की, संगणकाची गरज भासायची. मात्र, सध्या मोबाईलसह व लॅपटॉपवरही इंटरनेट चालविता येते. नेटचे दरही कमी आहेत. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअॅपचा वापर वाढला आहे. हे वापरण्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. सोशल मीडियामुळे संपर्क वाढला असला, तरी त्याचा गैरवापरही होत आहे. स्मार्ट फोनवर सोशल मीडियाचे अॅप्लिकेशन सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अनेक जण मोबाईलवरूनच फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटर हे अॅप्लिकेशन हाताळतात. समोरच्या व्यक्तीने एखादी कॉमेंट टाकल्यास त्यालाही तितक्याच तातडीने प्रतिसाद दिला जात आहे. मात्र, नोंदविलेल्या प्रतिक्रियेमुळे काही पडसाद उमटतील का, याचा विचार केला जात नाही. यापूर्वीही फेसबुकवर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने समाजात तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता तर फेसबुकवर कॉमेंट केल्याच्या रागातून तरुणांना बेदम मारहाण करण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. हिंजवडीतील म्हाळुंगे येथील तरुणाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार नुकताच घडला. तर बुधवारी रात्री फेसबुकवर ‘सुसाईड नोट’ टाकून बेपत्ता झालेल्या चिंचवडमधील तरुणाचा शोध घेताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. (प्रतिनिधी)
सोशल मीडियाचा ताप
By admin | Updated: May 18, 2015 05:42 IST