पुणे : जबाब देण्यात पोलीस दबाव आणत असल्याच्या कारणास्तव मोक्काअंतर्गत अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा अर्ज विशेष न्यायालयात केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले असून, ८ जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे.अभय रमेश कुलथे (वय ३३, रा. कोल्हार, ता. राहता, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो व्यवसायाने सोनार असून, त्याचे कोल्हार येथे सोने-चांदी विक्रीचा व्यवसाय आहे. पुणे शहर पोलिसांनी एका गुन्ह्यात दरोडेखोरांची टोळी अटक करून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. दरोड्यातील चोरी केलेला ऐवज अभयला विकला. चोरीचा माल विकत घेणे हा कायद्याने गुन्हा असल्याने त्याला पोलिसांनी विविध ११ गुन्ह्यात अटक केली असून, त्याच्यावरही मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. आरोपी अभय याने दंडाधिकारी यांच्यापुढे कबुली जबाब द्यावा यासाठी दबाव आणत होते. परंतु त्याच्याविरोधात कुठलाही सबळ पुरावा नसल्याने तो दंडाधिकारी यांच्यासमोर जबाब देऊ इच्छित नाही. त्याच्यावर गुन्हे शाखेचे पोलीस दबाव टाकत असल्याचे त्याचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी सांगितले. अभय याच्या वतीने अॅड. पवार व अॅड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत विशेष न्यायालयात पोलिसांवर कारवाई करावी, असा अर्ज करण्यात आला आहे.
सहा. आयुक्तांवर कारवाई करा
By admin | Updated: January 7, 2016 01:45 IST