शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण टोल नाका बंद करण्यासाठीचे आंदोलन येत्या दोन दिवसांत तीव्र केले जाईल. प्रसंगी गनिमी कावा वापरून आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा ठाम निर्धार बंडातात्या कराडकर यांनी शिक्रापूर येथे व्यक्त केला. गेली सहा महिने चाकण-शिक्रापूर रोडवरील टोलनाका बंद करण्यासाठी स्थानिक शिक्रापूर ग्रामस्थांबरोबरच क्रांतिवीर प्रतिष्ठान, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, किसान संघ, भारत स्वाभिमान न्यास व टोलविरोधी कृती समिती शिक्रापूर यांनी वेळोवेळी मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता.आजपासून (दि.२४) या टोलनाक्यावर आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या वेळी बंडातात्या कराडकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. या वेळी संजय पाचंगे, रमेश टाकळकर, डॉ. धनंजय खेडकर, शिक्रापूरचे सरपंच संजय जगताप, रामभाऊ सासवडे, अंकुश घारे, ज्ञानेश्वर खेडकर, अमोल बैलभर, सचिन जाधव तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्रापूर ग्रामस्थ व विविध संघटनांनी सुरू केलेल्या गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलनाने हा प्रश्न मिटत नसेल तर वेळप्रसंगी आंदोलन तीव्र करून या टोलनाक्याला कुलूप ठोकल्यावरच आंदोलन मागे घेण्याचा निर्णय या वेळी आंदोलकांनी घेतला. या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. टोल न भरण्याचे आंदोलन सुरू करणार असल्याचे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी या वेळी सांगितले. आज सकाळी सात वाजेपासून टोल नाक्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची गणती आंदोलकांनी सुरू केली. या वेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले व मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)
शिक्र्रापूरचा टोल बंद करा
By admin | Updated: February 24, 2015 23:07 IST