न्हावरे : उरळगाव (ता. शिरूर) येथे शिरूर तालुका कुस्तीगीर संघ व उरळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात शिक्रापूरचा गणेश रामभाऊ सासवडे याने आकाश पवार यांच्यावर मात करून ‘शिरूर तालुका मल्ल सम्राट २०१७’ हा बहुमान मिळविला आहे.या कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात अतिशय अटीतटीच्या व उत्कंठा शिगेला पोचलेल्या गणेश सासवडे व आकाश पवार यांच्या लक्षवेधी लढतीत अखेर गणेश सासवडे याने विजय मिळविला. तर, स्पर्धेचा उपविजेता आकाश नबाजी पवार ठरला.शिरूर तालुका मल्लसम्राट २०१७चा मानकरी गणेश सासवडे याला जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे यांच्या हस्ते चांदीची गदा, बुलेट, रोख १५ हजार ५०० रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्ल व उरळगावचे सुपुत्र चांगदेव होलगुंडे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा जिल्ह्यातील विविध संस्था व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती मंगलदास बांदल, शिरूर पंचायत समितीचे सभापती सिद्धार्थ कदम, सरपंच सुरेखा सात्रस, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सात्रस, उपसरपंच पोपटराव बिडगर, रामभाऊ सासवडे, प्रशांत सात्रस, सुनील सात्रस, राजेंद्र गिरमकर, प्रभाकर जांभळकर, अप्पासाहेब बेनके, अशोक कोळपे, रमेश बांडे, अंकुश होलगुंडे उपस्थित होते. या स्पर्धेचे पंच म्हणून झेंडू पवार, नाना खोपडे, तुषार गोळे, रवी बोत्रे, बाळासाहेब भालेराव यांनी काम पाहिले. स्पर्धेचे निवेदन बाबा निम्हण व शंकर पुजारी यांनी केले. (वार्ताहर)स्पर्धेचा निकाल : २८ किलो वजनगट - किशोर पिंगळे (भांबर्डे), ३२ किलो वजनगट - किरण पवार (निमगाव म्हाळुंगी), ३८ किलो वजनगट - शुभम भंडारे (वढू बुद्रुक), ४५ किलो वजनगट - अजय फुलफगर (आंबळे), ५२ किलो वजनगट - कृष्णा थोरात (उरळगाव), ६० किलो वजनगट - कुलदीप इंगळे (इंगळेनगर), ६६ किलो वजनगट - अजित पवार (अण्णापूर), ७४ किलो वजनगट - किरण पवार (निमगाव महाळुंगी). वरील विजेत्या मल्लांना त्यांच्या गटातील मल्लसम्राट किताब व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
गणेश सासवडे यांना शिरूर मल्लसम्राट किताब
By admin | Updated: February 9, 2017 02:54 IST