जुन्नर तालुक्यातील आणे येथे प्रतिवर्षी पौष शुद्ध प्रतिपदेला श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा भजन तसेच मुख्य दिवशी महाआरती होते व येणाऱ्या भाविकांना आमटी-भाकरीच्या महाप्रसादाचे वितरण केले जाते; परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने सर्व कार्यक्रमावर निर्बंध घातले असून बुधवार दि. ६ जानेवारी ते गुरुवार दि. १४ जानेवारी या कालावधीत बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास जमाव बंदी व तत्सम कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. असे देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी सांगितले. तसेच या कालावधीत पहाटे काकडा भजन, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ व रात्री भजन असे नित्यनेमाने कार्यक्रम मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडतील. मुख्य सोहळ्याच्या दिवशी होणारा महाआरतीचा कार्यक्रम मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडेल. १४ जानेवारी रोजी गुरुवारचा आठवडे बाजार बंद राहील अशी माहिती त्यांनी दिली.
श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी यावर्षी साध्या पद्धतीने, भाविकांना मंदिर परिसरात येण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST