बारामती : चिमणी हा पक्षी शहरातून नाहीसा होण्याच्या मार्गावर असतानाच बारामती शहरातील पक्षिप्रेमींमध्ये ‘चिमण्यांचे झाड’ म्हणून प्रसिद्ध असलेले रामकाटी बाभळींची कत्तल होत असल्याने चिमण्यांचा निवारा हिरावला जात आहे. ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा आज जन्मदिवस ‘पक्षिदिन’ म्हणून साजरा केला जातो.
चिमणी हा पक्षी निसर्गातील ‘सफाई कामगार’ म्हणून ओळखला जातो. चिमणी परिसरातील किडे, अळ्या, मुंग्या यावर गुजराण करते. या अळ्या, किडे प्रामुख्याने शेतातील पिकांवर असतात. यामुळे परिसर स्वच्छ करण्याचे महत्त्वाचे काम करते. कावळा, गिधाड आणि चिमणी हे पक्षी सफाई कामगार म्हणून ओळखले जातात.
चिमणी आपले घरटे झाडाची ढोली किंवा खोबणी किंवा माळवदाच्या घरामध्ये बांधते. रामकाटी बाभळ हे चिमणीचे सर्वात आवडते झाड आहे, कारण या झाडाच्या विशिष्ट रचनेमुळे चिमण्यांना घरटे बांधताना आधार मिळतो.
चिमण्यांना या झाडामुळे बहिरी ससाणा या त्यांच्या पारंपरिक शत्रूपासूान संरक्षण मिळते. चिमणीला स्वत:ला घरटे विणता येत नाही. चिमणी घर बनविते.
आजूबाजूला असलेला पालापाचोळा, कचरा, कापूस, काडय़ा यांचा वापर करून चिमणी घरटे बांधते. मात्र आता शहरीकरणाच्या गराडय़ात या चिमण्यांना उपलब्ध असलेली माळवदाची घरे किंवा रामकाटी बाभळींचे प्रमाण कमी झाले आहे.
चिमण्या सर्वात जास्त संख्येने राहात असलेल्या रामकाटी बाभळींची कत्तल करण्यात येत असल्याने मात्र चिमण्यांचा हक्काचा निवारा नष्ट झाला आहे. या चिमण्या लवकरच आपला नवीन निवारा शोधतीलही; मात्र आता ‘येथे होते एक झाड चिमण्यांचे!’ असेच म्हणावे लागेल.