शहरातील कोरोना ८ जूनपासून बारामतीत सकाळी नऊ ते एक वेळ व्यापाऱ्यांसाठी लागू करण्यात आली होती. तर अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी सकाळी नऊ ते दुपारी चार अशी होती. आता सर्व दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयामुळे दुकानदारांना दिलासा मिळाला असून मागील दोन महिन्यांहून अधिक काळ दुकाने बंद ठेवावी लागलेली असल्याने मोठा आर्थिक फटका, मालाचे नुकसान सहन करावा लागला आहे.
मंगळवारपासून वेळ वाढवल्याने व्यवहार पूर्वपदावर येणार आहेत. हॉटेलचालकांना मात्र अद्याप हॉटेल्समध्ये ग्राहकांना बसण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तर, पूर्वीप्रमाणेच पार्सल सेवा त्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे हॉटेलचालकांमध्ये नाराजी आहे. आमच्याकडे प्रशस्त जागा असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळू शकतो. स्वच्छता व इतर बाबींकडे लक्ष दिले जात असताना ग्राहकांना हॉटेलात बसण्यास परवानगी का दिली जात नाही, असा सवाल हॉटेलचालक उपस्थित करत आहेत. दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी कोरोनाचे सावट अद्याप दूर झालेले नाही. त्यामुळे बाजारपेठ सुरू झाली तरी दुकानमालक, कामगार तसेच ग्राहकांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.