घोडेगाव : रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना तहसीलदार बी. जे. गोरे यांनी रात्री दोनच्या सुमारास १ लाख ५४ हजार रुपयांचे ५२ पोती धान्य पकडले. शिनोली (ता. आंबेगाव) येथे ही कारवाई करण्यात आली असून, घोडेगाव पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंचर-भीमाशंकर रस्त्यावर शिनोली गावाजवळ सुरू असलेल्या नवीन इमारतीसमोर रेशनच्या धान्याने भरलेला टेम्पो (एमएच १४/एफ ८५८०) उभा असल्याची माहिती तहसीलदारांना गुप्त माहीतगाराकडून मिळाली. यानंतर त्यांनी समक्ष जाऊन खात्री केली असता, त्यामध्ये गव्हाचे ५० किलोंचे ३५ कट्टे, तांदळाचे ५० किलोंचे १५ कट्टे असा १ लाख ५४ हजार रुपयांचा माल असल्याचे आढळून आले. टेम्पोचालक लहू बोऱ्हाडे यांना विचारले असता त्यांनी हा माल आपला असल्याचे सांगितले. यावरून हे धान्य अनधिकृतरीत्या स्वत:च्या फायद्यासाठी अपहार करण्याच्या उद्देशाने काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याप्रकरणी भारतीय जीवनावश्यक कायद्यानुसार लहू बोऱ्हाडे व अजून एक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार बी. जे. गोरे यांनी स्वत: फिर्याद दिली. माल पंचनामा करून घोडेगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. गिजरे करत आहेत. (वार्ताहर)
शिनोलीत धान्यसाठा पकडला
By admin | Updated: October 30, 2015 00:09 IST