घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या ७२ लोकांना माळीणजवळच असलेल्या अडिवरे गावच्या हद्दीत कायमस्वरूपी घरे बांधून देण्याचा निर्णय घोडेगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत झाला. या वेळी काही ग्रामस्थांनी तालुक्याच्या पूर्व भागात घरे, जमीन व नोकरी मिळावी अशी मागणी केली, तर काही ग्रामस्थांनी माळीणजवळच पुनर्वसन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जमिनीसह पुनर्वसन होऊ शकत नाही, अशा काही गोष्टी स्पष्ट सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी अडिवरे येथे पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. या बैठकीत १५१ मयत वारसांच्या २७ कुटुंबांना राज्य शासनाने दिलेल्या दीड लाख रुपये मदतीचे वाटप करण्यात आले. या वेळी १ कोटी १७ लाख रुपयांचे वाटप जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील, प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, डी. बी. कवितके यांच्या हस्ते झाले.या वेळी मच्छिंद्र झांजरे यांना मदतीचा चेक घेताना रडू आवरले नाही. गणेश पाटील यांच्या हस्ते चेक स्वीकारताना ते रडले. एकूण ४४ कुटुंबे असून, २ कोटी २६ लाख ५० हजार रुपयांचे वाटप केले जाणार आहे. उर्वरित कुटुंबांची वारस निश्चिती व काही कागदपत्रांची पूर्तता झाल्याबरोबरच त्यांना ही मदत दिली जाणार आहे. काही ग्रामस्थांनी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात जमीन, घरे व नोकरी मिळावी, अशी मागणी केली आहे. मात्र, जमिनीसह पुनर्वसन होऊ शकत नाही. अशा प्रकारे पुनर्वसनासाठी १५८ हेक्टर म्हणजे ५०० एकर जमीन लागेल. जिल्ह्यात एवढी ५०० एकर जमीन कुठेही नाही. सतत भूस्खलन होणाऱ्या उत्तराखंडमध्येही असा प्रयोग झालेला नाही, असे जिल्हाधिाकरी सौरव राव यांनी या वेळी स्पष्ट केले.(वार्ताहर)
अडिवरे येथे माळीणकरांना निवारा
By admin | Updated: August 25, 2014 05:06 IST