लोकमत न्यूज नेटवर्ककात्रज : मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर राजस सोसायटी चौकात ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा जागेवर मृत्यू झाला. राजकीय वादात अडकलेल्या या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.रविवारी (दि. २) दुपारी १२.१० वा. कात्रजकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या एमएच १२ एच. डी. ०१४९ हा ट्रक व कात्रज तलावाकडून राजस चौकात आलेली दुचाकी एमएच १२ एन.एम. ८१५२ यांच्यात झालेल्या अपघातात नवनाथ थिटे (वय ६५, रा. शिवप्रभा सोसायटी, शेलारमळा, कात्रज) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुचाकीचालक व मृत नवनाथ थिटे यांचा मुलगा सतीश नवनाथ थिटे (वय ३७) गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेवेळी स्थानिक नगरसेवक प्रकाश कदम, नगरसेवक वसंत मोरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी सतीश थिटे यांना कात्रज येथील साई स्नेह हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. दरम्यान ट्रकचालक हा गाडी घेऊन घटनास्थळापासून पळून जात असताना नगरसेवक वसंत मोरे यांनी आपली गाडी त्या ट्रकला आडवी घालून ट्रक थांबवली व त्या ट्रक चालकाला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर ढगे, सहा. पोलीस निरीक्षक विलास भुजबळ यांनी विस्कळीत झालेली वाहतूक नियंत्रित केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.श्रेयवादाची लढाई बंद व्हावीया रस्त्याचे काम करण्याचे श्रेय घेण्याच्या नावाखाली मागील अनेक वर्षांपासून राजकीय अडथळे आणले जात आहेत. मात्र जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी किंवा श्रेयासाठी या होणाऱ्या विकासकामाला खोडा घालण्याचे काम करू नये. लोकप्रतिनिधींनी श्रेयवादाची लढाई बंद करून हा रस्ता तातडीने मोठा करून या रस्त्याला मृत्यूच्या सापळ्यातून मुक्त करावे, अशी अपेक्षा येथील समान्य नागरिक करीत आहेत.
अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
By admin | Updated: July 3, 2017 03:22 IST