पुणो : भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मण ऊर्फ अण्णा सोनोपंत जोशी यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 79 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. नगरसेवक ते खासदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द लक्षवेधी ठरली.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऐंशीच्या दशकात शुक्रवार पेठेतून दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेलेल्या अण्णा जोशी यांनी शिवाजीनगर मतदारसंघातून दोनदा तर कसबा मतदारसंघातून एकदा विधानसभेची निवडणूक जिंकली. पुणो मतदारसंघातून ते लोकसभेवर गेले. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध होते. ते पुण्याच्या घोष शाखेत स्वयंसेवक होते. भाजपाच्या तिकिटावर तीन वेळा आमदारकी आणि एक वेळा खासदारकी मिळवणा:या अण्णा जोशी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कोथरूड मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांची ती शेवटची निवडणूक ठरली.