महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने तसेच पोलिसांना बघून मुंबईच्या दिशेने निघाले गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. त्यांनी वाहनातून उतरून झालेल्या अपघातांची माहिती घेतली. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने सुसाट जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लागणे अशक्य होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हे उपाययोजना करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नऱ्हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर भूमकर यांनी केला आहे.
..........
पोलिसांनी काढले जखमींना बाहेर
अपघातग्रस्त वाहनांतील जखमींना सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रिक्षा व ट्रक अपघातामधील रिक्षा प्रवासी म्हणून बसलेल्या महिलेचे तीन महिन्यांचे बाळ रडत असल्याचे दिसल्याने पोलीस कर्मचारी गणेश झगडे यांनी तत्काळ लहान बाळाला बाहेर काढले. लहान बाळाच्या नाकाला व तोंडाला थोडी इजा झाली असून बाळाला व त्याच्या आईला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नशीब बलवत्तर म्हणून....
नऱ्हे येथील ऑक्सीजन व्हॅली सोसायटीत राहणारे प्रवीण गायकवाड हे आपल्या दुचाकीवरून कामास निघाले होते. ज्या कंटेनरने रिक्षाला धडक दिली. त्या रिक्षाच्या पुढे ते दुचाकी चालवीत होते. त्यांच्या दुचाकीलाही पाठीमागून धडक बसल्याने ते समोर असणाऱ्या कंटेनरला धडकले. त्यांच्या मोटारसायकलचे ह्यामध्ये नुकसान झाले असून त्यांच्या हातालाही जोराचा मार लागला आहे.
......
सुहास चिटणीस,
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन
आमच्या विभागाकडून महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल या सहा किलोमीटरच्या महामार्गावर सर्व्हे केला असता उताराचा भाग आहे.
नियमानुसार महामार्गावर पाच टक्के ग्रेडियंट असला तरी चालतो. या परिसरातील ग्रेडियंट हा साडे तीन ते चार टक्के आहे. त्यामुळे तितका उतार या भागात नाही. काही चालक उतारावर आपले वाहन न्युट्रल करतात आणि त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटते.
.........
राहुल श्रीरामे
पोलीस उपायुक्त ( वाहतूक विभाग)
यापूर्वीच वाहतूक विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने या रस्त्याचा सर्व्हे करण्यात आला आहे. स्पीड लिमिट, रंबलर्स, वाहतूक नियमांचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र चालकांनी जागरूकपणे वाहन चालविणे गरजेचे आहे, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला ७ दिवसात अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
..........
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धरले धारेवर
पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड व पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग) राहुल श्रीरामे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत याआधी पोलिसांकडून देण्यात आलेल्या पत्रातील उपाययोजना बाबत काय कामे केली आहेत, असा सवाल करीत प्रश्नांची सरबत्ती केली. अपघात रोखण्यासाठी आठ दिवसांत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.