पुणे : देशात आॅक्सिजनअभावी एकही मृत्यू झालेला नाही, असे अजब स्पष्टीकरण केंद्र सरकारने संसदेत दिले. प्रत्यक्षात आॅक्सिजनचा तुटवडा आणि वेळीच आॅक्सिजन न मिळाल्याने रुग्णांचे झालेले हाल कोरोनाच्या दुस-या लाटेत सर्वांनीच अनुभवले. तिस-या लाटेमध्ये या भीषण परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आॅक्सिजनचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दुस-या लाटेत राज्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागल्यावर त्याचा आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. एप्रिल महिन्यात पुण्यातील योग हॉस्पिटलमध्ये आॅक्सिजनअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली होती आणि हॉस्पिटलमधील डॉ. अभिजीत दरक यांनीही दुजोरा दिला होता. अनेक रुग्णालयांमध्ये खूप प्रयत्न करुनही प्रशासनाकडून आॅक्सिजनचा तातडीने पुरवठा होत नसल्याने डॉक्टरही हतबल झाल्याचे चित्र रुग्ण आणि नातेवाईकांनी पाहिले होते.
--------------
लिक्विड मेडिकल आॅक्सिजनची साठवणूक, पीएसए प्लांट, आॅक्सिजन आॅडिट यामाध्यमातून सातत्याने आॅक्सिजनचे नियोजन सुरु आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेमध्ये आॅक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी गरजेपेक्षा तीनपट साठवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. दुस-या लाटेमध्ये पुणे जिल्ह्याला दररोज ३६० मेट्रिक टनची गरज भासत होती. नियोजनाच्या दृष्टीने ग्रामीणमध्ये २९ ठिकाणी आॅर्डर दिल्या आहेत. त्यापैकी १० ठिकाणी प्लांट उभारले गेले आहेत. पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवडमध्येही १०-१२ एसपीए प्लांट कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
------------------------
पुणे जिल्ह्याची दररोजची आॅक्सिजन उत्पादन क्षमता ३५५ मेट्रिक टन इतकी आहे. यामधये ३ लिक्विड मेडिकल आॅक्सिजन प्लांट, ३ एअर सेपरेशन युनिट आणि १७ रिफिलर यांचा समावेश आहे. दुस-या लाटेत आॅक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी जिल्ह्यात सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले.
- एस.बी.पाटील, सहाय्यक आयुक्त, एफडीए
--------------------
कार्यान्वित आॅक्सिजन प्लांट :
कार्यक्षेत्र रुग्णालयांची संख्या उत्पादन क्षमता (एलपीएम)
पुणे मनपा ६ ८,४००
पिं.चिं. २ २,०१०
ग्रामीण ८ २,६८४
----------------------------------------------------
एकूण १६ १३,०९४
----------------------------
प्रस्तावित आॅक्सिजन जनरेशन प्लांट :
कार्यक्षेत्र रुग्णालयांची संख्या उत्पादन क्षमता (एलपीएम)
पुणे मनपा ११ ९,९३३
पिं.चिं. ५ ४,५५०
ग्रामीण २२ १२,२७५
----------------------------------------------------
एकूण ३८ २८,७६८