पुणे : महापालिकेच्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी विनामोबदला क्रीडा, अभ्यास वर्ग व व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम राबविणाऱ्या नोंदणीकृत सामाजिक व स्वयंसेवी संस्थांना सुधारित भाडेआकारणी करण्यात येणार आहे. महापालिका शाळांच्या वर्गखोल्यांसाठी मासिक १० हजारऐवजी ३ हजार आणि मैदानांसाठी ५० हजारऐवजी पाच हजार रुपये भाडे आकारणीच्या प्रस्तावाला आयुक्त कुणाल कुमार यांनी मान्यता दिली आहे. भाडे आकारणीचा सुधारित प्रस्ताव लवकरच स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी बुधवारी दिली. शहरात महापालिकेच्या ३१० शाळा असून, १२० मैदाने आहेत. गेल्या काही दिवसांत सामाजिक संस्था व खासगी संस्थांकडून महापालिका शाळांच्या खोल्या व मैदानांची मागणी वाढली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सरासरी २० ते १०० पट भाडेवाढ केली होती. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी विनामोबदला सामाजिक संस्थांतर्फे राबविले जाणारे व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर होते. या विषयाला ‘महापालिकेने मांडला मैदानांचा बाजार’ या वृत्ताद्वारे ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. दरम्यान, शहरातील सुमारे १८ सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थांनी भाडेवाढ मागे घेण्याची मागणी शिक्षण मंडळाकडे केली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शाळांच्या खोल्या व मैदानांची भाडेवाढ मागे घ्यावी. अन्यथा सामाजिक संस्थांच्या उपक्रमाला खीळ बसेल, अशी मागणी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष निरुद्दीन सोमजी, माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ व माजी उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. यावर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना माहिती घेऊन सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी सुधारित प्रस्ताव आयुक्तांना सादर केला. त्यामध्ये व्यावसायिक संस्थांचे दर कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, सामाजिक संस्था नोंदणीकृत असून, विनामोबदला प्रशिक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेला सुधारित दर आकारणीची अट घालण्यात आली आहे. त्यानुसार सामाजिक संस्थांसाठी सुधारित दर आकारण्याच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)
शाळेची मैदाने सवलतीत मिळणार
By admin | Updated: August 13, 2015 04:44 IST