शिवप्रसाद डांगे , रहाटणीरात्री आठची वेळ... तसा शिवार चौक इतर दिवसांपेक्षा रविवारी गजबजलेला... रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्किंगमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने लावलेली. पदपथावर माणसे. मात्र, काही कळण्याच्या आत एका चारचाकीने एकामागून एक अनेक वाहनांना ठोकरले. ती गाडी पुढे जाऊन थांबली; पण कुणाला दुखापत झाली नाही. वरकरणी ही चित्रपटातील घटना वाटत असली, तरी ही एक सत्य घटना आहे, तसेच तो वाहनचालकही सुखरूप आहे. तो सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात नेहमीच गर्दी असते. मात्र, या परिसरात आयटी क्षेत्रातील कर्मचारी वास्तव्यास असल्याने या परिसरात शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रविवारी रात्री आठच्या सुमारास एका चारचाकी वाहनचालकाची तब्येत अचानक बिघडल्याने वाहनावरील ताबा सुटला. त्यांच्या शेजारी त्यांचे मित्र बसलेले होते. त्यांनाही काही कळण्याच्या आत गाडी रस्त्याच्या कडेला पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना धडकू लागली. त्या मित्राला वाटले की, यांना हार्टअॅटॅक आला असावा. म्हणून ते त्यांची छाती दाबण्याचा प्रयत्न करू लागले. तोपर्यंत सलग सात वाहनांना धडक मारून गाडी सुमारे पन्नास फूट लांब रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. त्यानंतर वाहनचालकाला दवाखान्यात दाखल केले.
दैव बलवत्तर म्हणून वाचलो!
By admin | Updated: September 22, 2015 03:09 IST