सासवड : सासवड शहरातील महावितरण कंपनीविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार येणारी चुकीची वीजबिले, नादुरुस्त वीज मीटर बदलण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.वेळेवर वीज मीटरचे रीडिंग न नेल्यामुळे सरासरी १०० युनिटचे बिल येत असेल, तर त्यापुढे युनीट गेल्यास बिलाची रक्कम वाढणे, बिल मुदतीनंतर देणे, मीटर चालू असतानादेखील नादुरुस्त दाखविणे, वीजबिलावर फोटो नसणे या सर्व घटनांना आऊटसोर्सिंगच्या नावाखाली नेमलेली एजन्सी जबाबदार आहे.सासवड नगर परिषदेलादेखील याचा फटका बसला असून स्ट्रीट लाईटची बिले अगोदरच्या बिलापेक्षा जास्त येतात. मीटर रीडिंग दिसत नाही. फेब्रवारी २०१७ची बिले यापूर्वीचे बिल भरूनदेखील नवीन वीजबिलात लागून आली आहेत. सासवड नगर परिषद ही वेळेवर बिल भरणारे महावितरणचे ग्राहक आहे. सासवड नगर परिषदेच्या वतीने लाईट बिलात बचत करण्यासाठी एलईडीचे विद्युत दिवे बसविले आहेत.तरी, पूर्वीप्रमाणेच बिल येत असल्याने महावितरणचे अधिकारी हितेंद्र भिरूड यांना सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांच्यासह उपनगराध्यक्ष विजय वढणे, यशवंतकाका जगताप, सुहास लांडगे, अजित जगताप, गणेश जगताप, प्रवीण भोंडे, सासवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष रोहित इनामके, विठ्ठल दिवसे यांनी निवेदन दिले आहे. याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी; अन्यथा कायदेशीर बाबींबरोबरच तीव्र आंदोलनाचा इशारा नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी दिला.
सासवड नगर परिषदेलादेखील चुकीच्या वीजबिलांचा फटका
By admin | Updated: March 23, 2017 04:14 IST