भंडा-यातील घटना : अपघात टाळण्यासाठी काटेकोर अंमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ससून आणि औंध जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभाग सुरक्षित असल्याची आणि संपूर्ण यंत्रणा योग्य असल्याची हमी देण्यात आली आहे. मात्र दोन्ही रुग्णालयातील फायर एक्सटिंगविशर यंत्रणेची पुन्हा तपासणी होणार आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयात ५९ खाटांचा नवजात शिशू अतिदक्षता विभाग आहे. येथील फायर यंत्रणेची नुकतीच तपासणी करुन ना हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी ‘लोकमत’ला दिली. पुणे परिमंडलातर्फे पुणे, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमधील रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश आरोग्य विभागाने आहेत.
औंध जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर म्हणाले, “औंध जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट नियमितपणे केले जाते. रुग्णालयात २४ खाटांचा नवजात शिशु कक्ष आहे. दर आठवड्याला तांत्रिक कर्मचारी पाहणी केली जाते. खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
पुणे महानगरपालिकेच्या १८ प्रसूतिगृहांपैकी कमला नेहरू रुग्णालय, सोनवणे प्रसूतीगृह, येरवड्यातील भारतरत्न राजीव गांधी रुग्णालयातही नवजात शिशू अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. तेथील फायर यंत्रणेचाही आढावा लवकरच घेणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
चौकट
“ससून रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभाग ५९ खाटांचा आहे. येथे पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही नवजात अर्भकांना उपचारांसाठी दाखल केले जाते. आपण अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट करून घेतले आहे. स्प्रिंकलरसह सर्व यंत्रणा कार्यान्वित आहे.”
- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
चौकट
“भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाची आणि नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे पुन्हा फायर ऑडिट करण्यात येणार आहे. याबाबत पत्रव्यवहारही लवकरच केला जाईल.”
- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य चिकित्सक