ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंचपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यासाठी साम,दाम,दंड, भेद आदि सर्व मार्गांचा वापर सुरू आहे. काही ठिकाणी त्रिशंकू अवस्था, काही ठिकाणी पहिल्यांदाच महिला सरपंच तर काही निवडी निश्चित झाल्या आहेत. सरपंचपद कोणाला मिळणार, याच्या चर्चा गावांतील पारावर रंगू लागल्या आहेत.अवसरी : अवसरी खुर्द येथील गावची सरपंच-उपसरपंच पदांची निवडणूक रविवार दि. २३ आॅगस्ट रोजी होणार आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून पहिल्यांदाच महिलेला सरपंचपदाचा मान मिळणार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. महिला सरपंचपदाचा मान आपल्या पत्नीला, सुनेला किंवा मुलीला मिळावा म्हणून कार्यकर्त्यांनी दबावतंत्र चालू केले आहे. ग्रामपंचायत सदस्यसंख्या १७ असून सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे असल्याचे बोलले जात आहे.अवसरी खुर्द सरपंचपद हे खुल्या सर्वसाधारण महिलावर्गासाठी असल्याने पहिला सरपंचपदाचा मान आपल्या पत्नीला, सुनेला, मुलीला मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्र्त्यांची सदस्यांबरोबर बैठक सुरू आहे. रसिका टेमकर, संगीता शिंदे, सुनीता कराळे, शकुंतला शिंदे यांची नावे सरपंचपदासाठी चर्चेत आहेत.अवसरी खुर्द ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. सन २०१५ ते २०२० साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून आले आहेत, तर शिवसेनेने या निवडणुकीत पॅनल उभे केले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक रविवार दि. २३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. टी. गाढवे यांनी दिली.
सरपंच, उपसरपंचांसाठी मोर्चेबांधणी
By admin | Updated: August 19, 2015 00:07 IST