दौंड : दौंड तालुक्यात बेकायदेशीर वाळूवाहतूक करणारी ३२ वाहने ताब्यात घेऊन प्रत्येक ट्रकमागे एक लाख रुपयांप्रमाणे ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. दौंड, कुरकुंभ, पाटस, यवत या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१५ यादम्यान १ कोटी १७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांत खळबळ उडाली आहे. पकडलेले वाळूचे ट्रक दौंड तहसील कचेरीच्या परिसरात उभे करण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर वाळू उत्खनन करणे बंद आहे; परंतु तालुक्याच्या काही भागात बेकायदेशीर वाळूउपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यातच हा वाळूउपसा रात्रीच्या वेळी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तहसीलदार आणि महसूल पथकाने रात्री गस्त घालून ही कारवाई केली. या कारवाईत महसूल खात्याचे कर्मचारी तसेच मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल सहभागी झाले होते. भविष्यात बेकायदेशीर वाळूउपशाविरोधात कडक धोरण राबविले जाणार आहे. तेव्हा बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे शेवटी दिघे म्हणाले.
वाळू माफियांना दणका!
By admin | Updated: October 11, 2015 04:24 IST