पुणे : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा सिंहगडाजवळील डोणजे गावच्या हद्दीमध्ये अगदी फिल्मी स्टाईलने खून करण्यात आला. जीपला ट्रक आडवा घालून त्याच्यावर गोळ्या झाडल्यानंतर बाहेर खेचून डोक्यात दगड घालून भर रस्त्यावर हा खून करण्यात आल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश दत्तात्रय निवंगुणे (वय ४०, रा. आंबी, पानशेत)असे खून झालेल्याचे नाव आहे. निवंगुणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचे तीन गुन्हे दाखल आहेत. डोणजे परिसरात त्याच्या साथीदारांनी अशोक पारगे यांचा खून केला होता. त्यानंतर त्याने सिंहगड रस्त्यावर माणिकबागेजवळ स्वत:च्याच चुलत भावाचाही खून केला होता. सिंहगड रस्ता आणि सिंहगड परिसरात त्याच्या नावाची दहशत होती.शुक्रवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास निवंगुणे हा त्याचा भाऊ, मामा आणि मित्रासह स्कॉर्पिओमधून पानशेत रस्त्याने जात होते. डोणजे गावापासून थोड्या अंतरावर हल्लेखोरांनी त्यांना ट्रक आडवा घातला. जीप थांबल्यावर मार्गावरुन मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोरांनी गाडीला चारही बाजूनी घेरले. मोटारीच्या काचा फोडून निवंगुणेवर बेछूट गोळीबार सुरु केला. त्याला गाडीमधून बाहेर खेचून सपासप वार करण्यात आले. त्याचा खून पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता हवेली पोलिसांनी वर्तवली असून घटनास्थळावर पोलिसांना घटनास्थळी दोन पुंगळ्या मिळून आल्या आहेत. पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरीक्त अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, पोलीस निरीक्षक दिलीप बोंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. (प्रतिनिधी)४रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निवंगुणेच्या डोक्यामध्ये दगड घालून हल्लेखोर मोटारसायकलींवरुन पसार झाले. त्याच्यावर हल्ला सुरु असताना जीव वाचवण्यासाठी त्याचा भाऊ आणि मामा पळून गेले. त्यांनीच मोबाईलवरुन ही माहिती पोलिसांना कळवली. बराच वेळ निवंगुणेचा मृतदेह रस्त्यामध्ये पडून होता.
सराईत गुन्हेगाराचा डोणज्यात खून
By admin | Updated: January 9, 2015 23:16 IST