पुणे : राज्यात निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असताना आता अखिल भारतीय साहित्य महामंडळही आमदारकीच्या शर्यतीत उतरले आहे! राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्तीत सहकार आणि समाजसेवेलाच प्राधान्य दिले जात असून कला, साहित्य व विज्ञानावर अन्याय होत असल्याची टीका महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालजंद्र जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. या क्षेत्रातील मान्यवरांचा राज्याला उपयोग नाही, असे शासनाने प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावे, अशी खोचक मागणीही त्यांनी केली. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, रमेश राठिवडेकर, अनिल कुलकर्णी, राजन लाखे आदी उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘‘घटनेत तरतूद असतानही नियुक्त्या होत नसतील, घटनेचा अवमान करण्यापेक्षा ही तरतूदच काढून टाका. सांस्कृतिक धोरणासाठी शासनाकडून नवा पैसा खर्च होत नाही. साहित्य संमेलनात ठराव झाल्यानंतर पाठपुरावा करूनही पुढे हालचाली होत नाहीत. मराठी भाषेच्या विकासासाठी पुढाकार घेण्याबाबत महामंडळाच्या सदस्यांकडेच इच्छाशक्ती नाही, इतरांना काय दोष देणार? महामंडळाच्या सर्वसाधारण सभेलाही मोजक्या सदस्यांची उपस्थिती असते.’’ (प्रतिनिधी)
साहित्य महामंडळही आमदारकीच्या शर्यतीत
By admin | Updated: February 11, 2017 02:19 IST