पुणे : रूपी बँकेचे खातेदार व ठेवीदारांवरील संक्रांत दूर न केल्यास १५ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पुणेकर नागरिक कृती समितीने दिला आहे. समितीच्या वतीने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर निर्बंध घातल्याने खातेदार व ठेवीदारांना व्यवहार करण्यास बंधने आली आहेत. अनेकांचे लाखो रुपये अडकल्याने मागील २३ महिन्यांच्या कालावधीत त्यांचे हाल होत आहेत. आता सर्व खातेदार व ठेवीदारांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. गेली दोन वर्षे दाबून ठेवलेला संताप आता कोणत्याही क्षणी उग्र रूप धारण करेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी ही माहिती दिली. बँकेचे विद्यमान प्रशासक डॉ. संजय भोसले यांची तातडीने उचलबांगडी करावी, सर्व संचालक, अधिकारी, रिझर्व्ह बँकेचे आॅडिटर, सहकार खात्याचे आॅडिटर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. खातेदार व ठेवीदारांचे सर्व पैसे व्याजासह परत मिळवून देऊन बँकेच्या पुनरुज्जीवनाचे लेखी आदेश येत्या १५ तारखेपर्यंत काढावेत; अन्यथा बेमुदत उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
रुपी बॅँक खातेदारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
By admin | Updated: January 7, 2015 00:44 IST