पुणे : तुळशीबागेत मे महिन्यात जागेच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीप्रकरणी मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी ए. बी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात दाखल झालेल्या या दोषारोपपत्रामध्ये पाटील यांच्यासह अन्य चार जणांचाही समावेश आहे. तुळशीबागेतील जागडेवाड्याच्या गल्लीत सुरू असलेल्या रसवंतीगृहाच्या जागेवरून मे महिन्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीत रसवंतीचालकाला जबर मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी आदित्य जागडे (रा. गणपती चौक, जागडेवाडा, बुधवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नगरसेविका रूपाली चंद्रशेखर पाटील-ठोंबरे (वय ३३), अजय प्रभाकर दराडे (वय ४४), नीलेश शशिकांत भागवत (वय २८), रूपेश चंद्रशेखर पाटील (वय ३०), विजय प्रभाकर दराडे (वय ४२, सर्व रा. शुक्रवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात ३२६, ३२५, ३२४, ५०४, ५०६(२), १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) या नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
रुपाली पाटील यांच्यावर दोषारोपपत्र
By admin | Updated: October 28, 2015 23:58 IST