पिंपरी : पूर्णानगर, चिखली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) एप्रिल महिन्यात मोशी, प्राधिकरण येथील स्वत:च्या जागेत स्थलांतरित होणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहरात ५ एप्रिल १९८४ मध्ये आरटीओची स्थापना झाली. तेव्हापासून ते ३१ मार्च २००६ला हे कार्यालय चिखलीतील पूर्णानगरला एका खासगी इमारतीत स्थलांतर झाले. येथे आरटीओला एका मजल्यासाठी तब्बल दीड लाख रुपये भाडे मोजावे लागत आहे. ३१ मार्च २०१६ला या कार्यालयाचा करार संपणार आहे. तसेच मोशीतील आरटीओ इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे १ एप्रिलपासून या कार्यालयाच्या स्थलांतराचे काम सुरू करण्यात येणार आहे. कार्यालयातील एक-एक विभाग टप्प्याटप्प्याने हलविण्यात येणार आहे. चिखलीतील कार्यालयात एका मजल्यावर १० खोल्या आहेत. यामध्ये मोटार वाहन निरीक्षक कक्ष, रेकॉर्ड रूम, खटला विभाग, अनुज्ञप्ती विभाग, परिवहन विभाग, अभ्यागत कक्ष, सर्व्हर रूम, स्मार्ट कार्ड रूम, खासगी वाहन व आस्थापन विभाग, रोखपाल विभाग आहे. जागा कमी असल्याने काही खोल्यांमध्ये दोन विभागांचे एकत्रित कामकाज केले जाते. तळमजल्यावर शिकाऊ परवान्यासाठी चाचणी घेतली जाते. नवीन इमारतीत तळमजला धरून आणखी तीन मजले आहेत. यातील दोन मजल्यांवर हे विभागांची सुटसुटीत रचना केली जाणार आहे, तर तिसरा मजला रेकॉर्ड ठेवण्यास पूर्ण वापरला जाणार आहे.मोशी हे पिंपरी-चिंचवड शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. आंबेगाव, खेड, जुन्नर, तळेगाव, लोणावळा या ठिकाणच्या लोकांना येथे येणे सोयीस्कर होणार आहे. मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र आहे. कृषी उत्पन्न समितीची बाजारपेठही आहे. (प्रतिनिधी)आरटीओचे वाचणार दरमहा दीड लाख रुपये चिखली येथे खासगी जागेत सध्या हे कार्यालय असून, दरमहा दीड लाख रुपये भाडे मोजावे लागत आहे. मोशी येथे स्वत:च्या जागेत हे कार्यालय स्थलांतरित होणार आहे. येथे प्रशस्त इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे. मोशीतील इमारतीत कार्यालय हस्तांतर केल्यानंतर आरटीओचे दर महिन्याचे भाडे वाचेल.तिसऱ्यांदा स्थलांतरआरटीओ कार्यालय आधी निगडीत होते. त्याचे २००६ मध्ये चिखलीत स्थलांतर झाले. आता १० वर्षांनंतर हे कार्यालय मोशी, प्राधिकरण येथे स्थलांतरित होणार आहे. ३० वर्षांतील तिसरे ठिकाण असणार आहे.लवकरच आरटीओ कार्यालय मोशी येथील नवीन इमारतीत स्थलांतर होणार आहे. एप्रिल महिन्यात स्थलांतराला सुरुवात करण्यात येणार आहे. नागरिकांची चांगली सोय होईल. त्यांना अत्याधुनिक सुविधा मिळतील.- अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
‘आरटीओ’ला मिळाली हक्काची जागा
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST