पुणे : शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व परिसरातील तब्बल २६३ शाळांमधील आरक्षित जागांसाठी एकही अर्ज आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत सोमवारी सायंकाळपर्यंत ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. लॉटरी पद्धतीने प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये येत्या १४ मेपर्यंत प्रवेश घेता येतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी सांगितले.शेख म्हणाले, ‘‘शिक्षण विभागातर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील पालकांकडून आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले. कमी कालावधीतच १८ हजार ५२ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. त्यातील ११ हजार ८४८ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले तर ९ हजार ८२१ अपात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एमएमएसद्वारे प्रवेशाची माहिती कळविण्यात आली. संबंधित शाळांमध्ये २ मे ते १४ मे या कालावधीत प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे पालकांनी तात्काळ प्रवेश घ्यावेत. तसेच शाळांनी या कालावधीत प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपल्ब्ध करून द्यावे.शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी मागविलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत २६३ शाळांसाठी एक अर्ज आला नाही.त्यामुळे या शाळांमधील प्रवेशासाठी दुसरी फेरी घेतली जाणार आहे, असेही शेख यांनी सांगितले.
आरटीई प्रवेश; २६३ शाळांमध्ये अर्जच नाही
By admin | Updated: May 3, 2016 03:42 IST