पुणे : ज्या नद्यांवरून पुणे ओळखले जाते त्या मुळा व मुठा या नद्यांचे पाणी विषारी झाले आहे. शास्त्रीय पाहणीचा अहवालच तसे सांगतो आहे. तरीही त्याचे गांभीर्य लक्षात न घेता पुणेकर त्यात रोज कचरा टाकतच आहेत व सांडपाणी सोडत आहेत व प्रशासनही त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. गोष्टी मात्र नदीकाठ संवर्धन व नदीपात्र सुधारणेच्या चालल्या आहेत.तब्बल ४१ किलोमीटर अंतराची नदी पुणे शहराला लाभली आहे, क्वचितच एखादे शहर असे भाग्यवंत असते. मात्र पुणेकर व महापालिका प्रशासन यांनी एकत्रितपणे या भाग्याचा कचरा केला आहे. त्याबाबत अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी आवाज उठवूनही प्रशासन काम करायला तयार नाही. संपूर्ण नदीपात्र कचºयाने वेढून गेले आहे. त्यातील पाणी नदीचे पाणी राहिले नसून ते काळेशार सांडपाणी व मैलापाणी झाले आहे.किनारे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचेकचºयाचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत फार वाढले आहे. त्यातही विघटन न होणाºया प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी नदीचे किनारे खराब केले केले आहेत. तेथील झाडाझुडपांना या पिशव्या अडकतात. तशाच राहतात. पाणी दूषित करतात. त्याशिवाय निर्माल्य, घरातील कचरा नागरिक पुलावरून थेट खाली नदीत भिरकावून देतात. तो कचराही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच बांधलेला असतो. बांधकामाचा राडारोडा रात्रीच्या सुमारास नदीच्या कडेला आणून टाकला जातो. गावांमधून कचºयाचे ढीग आणले जातात, जास्त झाले असतील तर ते जाळून जागा तयार केली जाते. या जळलेल्या वस्तूंची राख नदीपात्रात टाकली जाते. इतका लांब किनारा पण तिथे मिनिटभरही थांबवत नाही असा झाला आहे.संस्थांच्या कामाला मर्यादासागरमित्र, रुद्र, वनराई, प्लॅस्टिक वॉरियर, क्लिन गारबेज मॅनेजमेंट व अन्य काही सेवाभावी संस्था गेली अनेक वर्षे नदीच्या पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छ तसेच कागद, काच,पत्रा या संघटनाही हे काम करत असतात. मात्र शहराची एकूण लोकसंख्या लक्षात घेता या सगळ्याच कामाला मर्यादा आहेत. कसबा पेठेसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागातही नदीमध्ये सांडपणी सोडून दिलेले दिसते. एखाद्या कामापुरते म्हणून या संस्थांचे सहकार्य घेतले जाते. त्यानंतरपुन्हा या आघाडीवर शांतता होते.नाल्यांमधूनयेतो कचराआंबिलओढा, भैरोबा नाला, नागझरी अशा नाल्यांमध्येही कचरा टाकला जातो. या नाल्यांना पाणी आले की तो कचरा वाहून नदीत येतो. तसाच पुढे जातो. त्यामुळेही नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीत पाणी आणणारे जे स्रोत होते ते कधीचेच बंद पडले आहेत. खडकवासला धरणातून पाणी सोडले तरच नदीत चांगले पाणी येते, अन्यथा त्यातून वाहणारे पाणी हे शुद्ध सांडपाणीच आहे असे या क्षेत्रात काम करणाºया अनेकांचे म्हणणे आहे. चांगल्या पाण्याचा अभाव असल्यामुळेच तिथे डासांची संख्या वाढते. अनुकूल स्थिती मिळाली की हे डास नदीपात्राच्या बाहेरच्या वसाहतींमध्ये शिरतात. तिथे पुन्हा त्यांची संख्या वाढते व ते असेच आजार पसरवत जातात. त्यावरही उपाययोजना केल्या जात नाहीत. घाण पाण्यात जलपर्णी वाढते. येरवड्यापासून पुढे हे प्रमाण प्रचंड आहे. ती काढण्याकडेही दुर्लक्ष केले जाते.सोसायट्यांमधूनही कचरामानवी विष्ठा पाणी विषारी करते. ओली असताना ती पाण्याच्या तळाशी असते. विघटन व्हायला लागल्यावर पाण्याच्या पृष्ठभागावर ती काळ्या रंगात व बुडबुड्यांच्या स्वरूपात येते. आपल्या नद्यांवर असलेल्या कोणत्याही पुलांवरून थोडे खाली पाहिले की पाण्यावर असे कितीतरी बुडबुडे दिसतात. त्यामुळे पाणी विषारी होते. ग्रामीण भागातील नागरिकच असे करतात असे नाही, तर शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक सोसायट्यांमधून राहणाºया नागरिकांना आपण फार स्वच्छ आहोत असे वाटते, पण त्यांच्या घरांमधून तयार झालेले मैलापाणी , सांडपाणीही नदीतच जात असते.नदीपात्र संवर्धनासाठी जपानमधील एका संस्थेने केंद्र सरकारची हमी घेऊन नदीपात्र संवर्धनासाठी ९०० कोटी रुपयांचे कर्ज अल्पव्याजदरात उपलब्ध करून दिले आहे. त्याचा काही भाग प्राप्तही झाला आहे. त्याला वर्ष होऊन गेल्यानंतर आता कुठे महापालिकेने या कामासाठी सल्लागार कंपनी नियुक्त केली आहे. महापालिका नदीकाठ संवर्धन म्हणून एक वेगळा प्रकल्प राबवत आहे, त्याचीही फक्त घोषणाच होत आहे. मध्यंतरी केंद्रीत भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुळा-मुठेमधून जलवाहतूक सुरू करण्यासंबंधी विचार सुरू असल्याचे सूतोवाच केले होते, त्याचेही पुढे काही झालेले नाही. ही कामे सुरू कधी होणार, नागरिकांना नदीचा वापर नदी म्हणून करता यावा अशी स्थिती कधी निर्माण होणार, असा पर्यावरणप्रेमी संस्थांचा प्रश्न आहे.पाण्यातील आॅक्सिजनचेप्रमाण शून्यमहापालिका हद्दीभोवतालच्या गावांमधूनही नदीचा वापर कचराकुंडी व सांडपाणी आणि रसायने सोडण्यासाठी म्हणूनच केला जात आहे. नदीच्या पाण्यातील मानवी विष्ठेचे प्रमाण इतके आहे की त्यात प्राणवायूच शिल्लक राहिलेला नाही. पाण्याच्या एका दशलक्ष थेंबामध्ये ८ थेंब विरघळलेल्या आॅक्सिजनचे लागतात. ते प्रमाण विठ्ठलवाडीपासून पुढे थेट नदी संपेपर्यंत २ ते ३ इतके आहे. काही ठिकाणी तर ते शून्य आहे. अशा पाण्यात मासे तर काय साधे जीवजंतूही राहू शकत नाहीत.
नद्या की विषवाहिन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:47 IST