लोणी काळभोर : एक लाख रुपये माहेरहून न आणल्याने मारहाणीसह होणारा शारीरिक व मानसिक छळ याचबरोबर सासऱ्याने केलेला अतिप्रसंगाचा प्रयत्न या बाबी घडल्यानंतर दिलेली तक्रार मध्यस्थी करून मिटवली नसती, तर रोहिणी कोळेकर हिचा निर्घृण खून झाला नसता, अशी चर्चा थेऊर परिसरात दबक्या आवाजात चालू आहे. योगेश तुकाराम कोळेकर (वय २५, रा. काकडेमळा, थेऊर, ता. हवेली.) याने २५ मे रोजी आपली पत्नी रोहिणी (वय २३) हिचा गळा दाबून खून केला. रोहिणी मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर तिचा मृतदेह एका पोत्यात भरून वडील तुकाराम कोळेकर यांना घेऊन सोलापूर शहराजवळच्या मुंढेवाडी रेल्वे स्थानकाजवळच्या निर्जन ठिकाणी लोहमार्गावर नेऊन टाकला होता. लोणी काळभोर पोलिसांना त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती़ कोणताही पुरावा नसताना केवळ खबऱ्यांचे जाळे आणि तपासात चिकाटी दाखवून लोणी काळभोर पोलिसांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला़ तक्रार मागे घेतल्यानंतर तिला होणाऱ्या त्रासात वाढ झाली होती. २५ मे रोजी सकाळी ६ वाजून २० मिनिटांच्या सुमारास रोहिणीने वडिलांशी मोबाईलवरून संपर्क साधून ‘नवऱ्याने मला औषध पाजले असून, घराला बाहेरून कडी लावली असल्याचे’ सांगितले़ त्यानंतर फोन बंद झाला म्हणून वडिलांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी मोबाईल बंद होता. योगेशने ३० मे रोजी पत्नी हरवली असल्याची तक्रार दिली़ त्याअगोदर त्याने खून उघडकीस येऊ नये, यासाठी सर्व काळजी घेतली होती. संशय येऊ नये म्हणून त्याने २५ मे रोजी खून केल्यानंतर ५ दिवसांपर्यंत रोहिणी हिचे नातेवाईक अथवा आई-वडिलांकडे कसलीही चौकशी केली नव्हती. तरीही, गुन्हे शोध पथकाने शिताफीने तपास करून गुन्हेगार कितीही हुशार असो, पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतातच, हे सिद्ध करून दाखिविले. (वार्ताहर)-रोहिणी व योगेश यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता़ रोहिणीचे वडील अण्णा धोंडिबा थोरात यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर तिला कधीच सुखासमाधानाने नांदवण्यात आले नाही. तिला कायम मारहाण होत असे. वाईटपणा नको म्हणून पोलिसांत तक्रारही केली नाही. -पती, सासू व सासरा तिला कायमच शिवीगाळ, मारहाण करीत. त्यांना करण (वय ४) हा मुलगा व केतकी (वय २) ही २अपत्ये झाली. ‘हॉटेल व्यवसायासाठी एक लाख रुपये माहेरहून आण,’ असा तगादा लावत. दोन महिन्यांपूर्वी तिच्या सासऱ्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला़.-रोहिणी कोळेकर हिने त्या वेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती; परंतु परिवाराच्या बदनामीची भीती मध्यस्थांनी दाखविल्याने तिने तक्रार मागे घेतली होती. हीच तिची मोठी चूक ठरली.
तक्रार मागे घेण्याची चूक रोहिणी कोळेकर हिला भोवली
By admin | Updated: June 18, 2015 22:53 IST