पुणे : ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’ या विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ज्या लोकांनी अपघातात हात गमावले आहेत, त्यांची काळजी आता संपली आहे. कारण अशा लोकांना त्यांच्या कामात समस्यांना सामोरे जावे लागू नये या उद्देशाने मंदार वाजगे या विद्यार्थ्याने मायक्रोस्विचच्या आधारे नियंत्रित करणारा एक रोबोटिक हात तयार केला आहे. ज्यांनी आपले हात गमावले आहेत, परंतु ज्यांना अजूनही समाजाला, कुटुंबाला काहीतरी देण्याची इच्छा आहे अशा अपघातग्रस्तांचे स्वप्न मंदारने प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी हा हात तुटला आहे तिथे हा हात बसवून खऱ्या हाताला मायक्रोस्विचने जोडून त्या आधारे रोबोटिक हात नियंत्रित करायचा. या ठिकाणी मायक्रोस्विचचा उपयोग प्रेशर सेन्सरप्रमाणे करण्यात येतो. हा मायक्रोस्विच खऱ्या हाताची व स्नायूंची हालचाल डिटेक्ट करतो. त्यामुळे हात नसलेला माणूसदेखील एखादा खरा हात असलेल्या सामान्य माणसाप्रमाणे सर्व कामे करू शकण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींनी दोन्ही हात गमावले असतील ते या मायक्रोस्विचचा वापर करू शकणार नाहीत. कारण त्यांच्याकडे मायक्रोस्विचला सेन्स करणारा खरा हात नसेल. परंतु अशा व्यक्तींना चिंतेत पडण्याचे मुळीच कारण नाही. कारण मंदारने असा बूटदेखील तयार केला आहे ज्या बुटाला मायक्रोस्विच बसवण्यात आला आहे. जो पायांची व स्नायूंची हालचाल डिटेक्ट करतो अणि ज्याच्याआधारे ती व्यक्ती त्याला बसवलेले दोन्ही रोबोटिक हात पायाच्या आधारे नियंत्रित करू शकतो. मंदारला या रोबोटिक हाताची कल्पना टेलिव्हिजनवरील रोबोज पाहून सुचली. ई-वेस्ट साहित्यापासून या हाताची निर्मिती करण्यात आली आहे. या हाताच्या मॉडेलसाठी केवळ ५00 रुपयाचा खर्च आला आहे. तसेच या प्रयोगासाठी नागपूरमधील महाराष्ट्र अॅनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्युअर सायन्स गटामध्ये मंदारने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. (प्रतिनिधी)सध्या हे केवळ एक मॉडेल असल्यामुळे या हाताने कामे करता येत नाहीत. परंतु मायक्रोस्विचच्या जागी मोशन सेन्सर बसवल्यास सर्व प्रकारची कामे करता येतील. - मंदार वाजगे
मायक्रोस्विचद्वारे रोबोटिक हात
By admin | Updated: March 3, 2015 01:18 IST