लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रस्ते अपघात कमी करण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे दिले जाणार आहे. सध्या ‘ट्रेन द ट्रेनर्स’ या संकल्पनेअंतर्गत परिवहन विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यातील पाच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर हे शिक्षक इतर शिक्षकांना प्रशिक्षण देतील. तर नवीन वर्षामध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रस्ते सुरक्षेवर मार्गदर्शन करण्यास सुरूवात होण्याची शक्यता आहे.
जगाच्या तुलनेत १२ टक्के अपघात एकट्या भारतामध्ये होतात. भारतात दररोज १८ वर्षे वयापेक्षा कमी वय असणाऱ्या ४३ मुलांचे दररोज मृत्यू होत आहेत. प्रामुख्याने अतिवेग आणि मद्यपान ही अपघाताची कारणे असतात. संयुक्त राष्ट्रसंघानेही २०११ ते २०२० हे दशक रस्ते सुरक्षा कृती दशक म्हणून जाहीर केले आहे. याअनुषंगाने केंद्र शासनानेही राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरणांतर्गत शालेय प्रशिक्षणाचा भाग म्हणून रस्ता सुरक्षा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या सुचना दिल्या आहेत. राज्यातही काही दिवसांपूर्वीच या उपक्रमाची सुरूवात झाली आहे. राज्याचा परिवहन विभाग व शालेय शिक्षण विभागाकडून या मोहिमेची सुरूवात ‘ट्रेन द ट्रेनर्स’ या संकल्पनेपासून केली.
या उपक्रमांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावरील निवडक शिक्षकांना रस्ता सुरक्षा विषयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिवहन विभागाकडून हे प्रशिक्षण दिले जाईल. हे शिक्षक राज्यातील प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाला प्रशिक्षित करतील. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. विविध प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये रस्तेविषयक नियम, अपघातांबाबत जनजागृती केली जाणार आहे. बालवाडीपासून हे धडे दिले जाणार आहे.
---
शिक्षण विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यातून पाच शिक्षकांची निवड केली आहे. परिवहन विभागाकडून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर तालुकास्तर व शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण होईल. जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना धडे देण्याचे नियोजन केले जाणार आहे.
- संजय ससाणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व समन्वयक