पौड : करमोळी- भादस संभवे (ता. मुळशी ) या अंतर्गत रस्त्याचे होणारे निकृष्ट बांधकाम रावडे व आसदे येथील ग्रामस्थांनी बंद पाडले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारा करमोळी ते संभवे या सुमारे १३ किमी. रस्त्याची गेल्या ३ वर्षांपासून दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’मध्ये अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तयार झालेल्या या रस्त्याचे नूतनीकरण झाले होते, ते ही करमोळी ते खुबवलीपर्यंतचेच काम तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा या भागात दौरा असल्याने सार्वजनिक विभागाने अवघ्या दोन दिवसांत रातोरात करून टाकले होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात केलेले काम जास्त दिवस टिकले नाही. हा रस्ता मागील वर्षापर्यंत जि.प. कडे होता. जि.प.च्या फंडातून या रस्त्याचे काम होणे अपेक्षित होते. खराब रस्त्यामुळे दुचाकीचे अनेकदा अपघातही झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर या रस्त्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले होते. या रस्त्याच्या नवीन कामासाठी ७ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीसाठी १३ किमी.च्या कामाकरिता ३० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुळशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आसदे- कोळवण बीटचे शाखा अभियंता एच.डी. मस्तुद यांनी दिली. त्याच निधीतून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दुरुस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मागील आठवड्यात पाऊस सुरू झाल्याने हे काम काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. या आठवड्यात पाऊस थांबल्याने पुन्हा खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. परंतु, खड्डे बुजविताना कंत्राटदार डांबर न वापरता केवळ खडी व मुरूमाचाच वापर करीत असल्याची बाब रावडे व आसदे येथील ग्रामस्थ खंडू हुलावळे , मधुकर हुलावळे, अंकुश भरम, निवृत्ती हुलावळे, विठ्ठल हुलावळे, पप्पू हुलावळे आदी ग्रामस्थांनी या कामाचे कंत्राटदार राहुल तोंडे, नीलेश जोरी व सा. बां. मुळशी विभागाचे शाखा अभियंता मस्तुद यांना योग्य समज देऊन काम बंद करण्यास भाग पाडले.
करमोळी-भादस संभवे रस्त्याचे काम पाडले बंद
By admin | Updated: July 6, 2015 04:29 IST