पुणे: शहर आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणारा प्रस्तावित रिंग रोड आता चार पदरीऐवजी सहा व आठ पदरी करण्याचे दिल्लीत झालेल्या बैठकीत निश्चित झाले. या रिंग रोडची एकूण लांबी १६९.७३ किलोमीटर होणार असून, यामध्ये मेट्रो, बीआरटीसाठी कनेक्टिव्हिटीची खास सुविधा देखील ठेवण्यात येणार आहे.शहरावर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने या रिंग रोडची आखणी करण्यात आली आहे. सन २००७मध्ये रस्त्यांची आखणी करण्यात आली. त्यानंतर ३ वर्षे या मध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला आणि सन २००९मध्ये शहरा- भोवतालच्या सुमारे १७० किलोमीटरच्या रस्त्यासाठी त्या वेळच्या दरपत्रकानुसार (डीएसआर) केवळ तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. या रिंग रोडसाठी सुमारे सहा हजार एकर जमीन संपादित करावी लागणार असून, सर्वाधिक खर्च भू-संपादनासाठीच द्यावा लागणार आहे. हा रिंग रोड सहा ते आठ पदरी असणार असून, यामध्ये चारचाकी वाहने, पादचारी, सायकल ट्रॅक यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ कागदोपत्री आणि चर्चेचा विषय असलेल्या रिंग रोडच्या कामाला गुरुवारी दिल्लीत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमुळे गती मिळणार आहे. रिंग रोडच्या सर्वेक्षणाचे काम सुरूअसून, एइकॉम या आंतरराष्ट्रीय कंपनीस हा अहवाल नऊ महिन्यांत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये रिंग रोडसाठी येणारा खर्च कसा उभा करावा, जमीन संपादन, पर्यावरण आदी गोष्टींचा अहवालात समावेश आहे. त्यानंतर हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. शासनाने अहवालाला मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरूहोणार आहे. एमएसआरडीसीकडून प्रकल्पीय अहवाल अंतिम झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत रस्त्यांचे काम करण्यात येईल, असेदेखील गडकरी यांनी येथे सांगितले.
रिंग रोड होणार तब्बल ८ लेनचा
By admin | Updated: September 12, 2015 04:29 IST