पुणे : लोकशाही मूल्य नैतिकतेत उतरली नाहीत तर त्याचा उपयोग होत नाही. मतदानाचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. आरक्षणाचा हेतू काय याचा विचार केला जात नाही. लोकशाही हे वेगवान वाहन आहे. परंतु, ते चालवायचे कसे हे लोकांना कळत नाही. तरुणांनी सतत जागरूक राहून मतदान केले पाहिजे, असे मत दिग्दर्शक व अभिनेता नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाही गप्पा’ हा कार्यक्रम झाला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.
लोकशाही मूल्ये, भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने, मतदारांमध्ये लोकशाही मूल्यांची जागरुकता निर्माण करण्याचे मार्ग या विषयावर प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक पवार, सुहास पळशीकर, प्रवीण महाजन, रवींद्र धनक, श्रीरंग गोडबोले, राही श्रुती गणेश उपस्थित होते.
सुहास पळशीकर म्हणाले, लोकांनी लोकशाहीचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. लोकशाहीच्या मर्यादा सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे. लोकशाही जगवणारे नागरिक विद्यार्थ्यांनी बनावे.
----
महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता मंडळे’ सुरू करणार
इव्हीएम मशिनबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकांत देशपांडे म्हणाले, प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी मशिनची तपासणी केली जाते. मतदानाच्यावेळी मशिन बंद पडले म्हणून त्यातील डेटा लॉस होत नाही. अशावेळी पुढच्या प्रक्रियेसाठी दुसरे मशिन वापरले जाते. मतदार नोंदणी बंधनकारक करण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, मतदार नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी केलेली असणे बंधनकारक केल्यास मतदार नोंदणी वाढू शकते. विद्यार्थ्यांमध्ये मताधिकाराविषयी जाणीव-जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता मंडळे’ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
----
शहरातला मतदार आत्मकेंद्री
शहरी भागातील नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेतला सहभाग कमी का? यावर देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातल्या मतदारांची जीवनशैली अधिक आत्मकेंद्री आहे. करिअर, व्यवसाय यामध्ये तो गुंतलेला आहे. तृतीयपंथी, दिव्यांग तसेच शरीर विक्री करणाऱ्या महिलांना एनजीओमार्फत मतदान प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.