धनकवडी : भारती विद्यापीठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून घरफोडीतील सहा हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. शब्बीर रुस्तम शेख (वय ४०, रा. आंबेगाव पठार) असे अटक आरोपीचे नाव असून तो रिक्षाचालक म्हणून काम करतो.
फिर्यादी मंगल सुनील पवार (रा. कात्रज) यांच्या घराचा दरवाजा कुलूप लावून बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरातील पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले व पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६५,०००/- रुपयाचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे करीत होते. आरोपीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अंमलदार रवींद्र चिप्पा व सचिन पवार यांना घरफोडी करणारा हा चोरी केल्यानंतर रिक्षातून गेला असल्याचे समजले. दरम्यान संबंधित रिक्षा चालक हा कात्रज ते नवले ब्रिज असा व्यवसाय करत असल्यची माहिती मिळाली. लागलीच त्याचा शोध घेत असताना रिक्षा नवले ब्रिजकडून कात्रजच्या बाजूला येताना दिसली. रिक्षाचालकला रिक्षा थांबण्याचा इशारा केला असता त्याने रिक्षा न थांबवता पुढे निघून जाऊ लागला. मात्र त्याला अडवून कसून चौकशी केली असता, त्याने सदरची घरफोडी केल्याचे कबूल केले.
त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सहा हजार रुपये, कुलूप तोडण्यासाठी वापरलेला पाना व गुन्हा करताना वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र भोसले. रवींद्र चिप्पा, सर्फराज देशमुख, सचिन पवार, गणेश शेंडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड यांनी केली.घरफोडी करणारा रिक्षाचालक अटकेत