भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील हळव्या जातीच्या भातपिकाच्या कापणीच्या कामाला वेग आला आहे. काही ठिकाणी कापणी केलेल्या भातपिकांचे खळ्यावर आणून झोडणी करण्याचे आणि काही ठिकाणी उडव रचून ठेवण्याचे काम सध्या जोरात सुरूआहे. प्रत्येक शेतकऱ्यांचे काम सुरूअसल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळ वाफेवर भाताची पेरणी केली जाते. आणि जून महिन्यात पाऊस झाला की भाताची रोपे चांगली उगवून येतात. मात्र, या वेळी मागील वर्षीच्या तुलनेत फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भातरोपांची उगवण उशिराने झाल्याने पर्यायाने लागवडही उशिराने झाली. लागवडीनंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने काही ठिकाणची भाताची रोपे करपली तर काही ठिकाणी दाणा भरलाच नाही. पळंज तयार झाले. त्यामुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगतात.तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या रत्नागिरी २४, कर्जत १८४, कोळंबा, वरंगळ या कमी पाण्यावर साधारणपणे ९० ते १०० दिवसांत येणाऱ्या हळव्या जातीच्या भाताची कापणी सुरू आहे. भाताच्या कापणीचा दर १०० रोज व एकवेळ जेवण इतका आहे. हिर्डोशी, शिंद-महुडे खोऱ्याला भातपिकाचे आगार मानले जाते. तालुक्यातील एकूण ७४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक लागवड या भागात करण्यात येते. या वेळी पावसाअभावी साधारणपणे ६४०० म्हणजे ९० टक्केच लागवड पूर्ण झाली आहे. त्यातील भाताची पडझड होऊन नुकसान झाले, तर अवेळी पावसाने दाणा भरला नसल्याने व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने भाताच्या उत्पादनात ५० टक्के घट होण्याची शक्यता असल्याचे दत्तात्रय परखांदे या शेतकऱ्याने सांगितले.
भात कापणीच्या कामाला वेग
By admin | Updated: October 26, 2015 01:52 IST