इंदापूर : नगरपरिषदेकडे महावितरण विभागाची पाच कोटी रुपयांची थकबाकी असल्याने, शहराच्या पाच ठिकाणच्या स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा महावितरणने तोडला आहे.त्यामुळे नवीन वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी शहरातले निम्मे रस्ते अंधारात रहाणार आहेत.नगरपरिषदेने थकबाकी भरली नाही तर नाईलाजास्तव क्रमाक्रमाने इतर रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा तोडण्यात येणार असल्याचे संकेत महावितरणच्या अधिका?्यांनी दिले आहेत.इंदापूर नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा विभागाकडील २ कोटी ३६ लाख १६ हजार ८६० रुपए तर स्ट्रीट लाईटचे २ कोटी ६७ लाख रुपये असे वीजबिल थकीत आहे.गेल्या दहा वषार्पासून महावितरण कंपनी ही थकबाकी भरावी, यासाठी नगरपरिषदेकडे पाठपुरावा करत आहे.तथापि आश्वासन व तुटपुंजी रक्कम भरुन नगरपरिषदेचे प्रशासन वीज पुरवठा सुरळीत ठेवत आहे. थकबाकीमुळे वीजबिलावरील व्याजाचा आकडा फुगत चालला आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकीआधी वीजपुरवठा तोडण्याच्या महावितरण कंपनीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या.कारवाई झाली तर ऐन निवडणुकीत शहर अंधारात राहील.सत्ताधारी पक्षाची बेअब्रु होईल. विरोधकांना आयते कोलीत मिळेल म्हणून माजी उपनगराध्यक्ष भरत शहा,माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे,मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी चालू बाकी पैकी थोडी थोडी रक्कम भरण्याचे आश्वासन दिले. स्ट्रीट लाईटची वीजबिलाची थकबाकी भरली नसल्याने शहरातील गणेशनगर,१०० फूटी मार्ग, दूधगंगा रस्ता,व्यंकटेशनगर परिसरातील वीज तोडण्यात आला आहे.या संदर्भात बोलताना महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सज्जाद रशीद शेख म्हणाले की, नगरपरिषदेने जर चार ते पाच दिवसात थकीत वीजबिल भरले नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात उर्वरीत शहरातील वीज टप्प्या टप्प्याने तोडली जाणार आहे.(वार्ताहर)
प्रजासत्ताक दिनीच इंदापुरातील निम्मे रस्ते अंधारात
By admin | Updated: January 25, 2017 23:52 IST