पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) तब्बल ४०० बस स्पेअर पार्ट नसल्याने बंद आहेत, त्यासाठी पुणे व पिंपरी महापालिका निधी देण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे पीएमपीचा तोटा दिवसेंदिवस वाढत असल्याने एक कर्मचारी अस्वस्थ होता. अखेर राजेश कृष्णराव पवार या कर्मचाऱ्याने मुलांच्या शिक्षणासाठी साठविलेल्या पैशातून स्पेअर पार्ट खरेदी करून तीन बस सुरू केल्या. एका बाजूला पीएमपीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना पवार यांनी नवीन आदर्श निर्माण केला आहे. सध्या पीएमपी विविध कारणांनी चर्चेत आहे. पीएमपीच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कात्रज येथील पीएमपी डेपोमध्ये इंजिन मेंटेनन्स विभागात काम करणाऱ्या राजेश पवार यांनी स्वखर्चातून बस दुरुस्तीचा नवीन आदर्श घालून दिला. पवार यांचा मुलगा बारावीत शिकत आहे. पीएमपीच्या तुटपुंज्या पगारातून दर महिन्याला काही रक्कम त्यांनी मुलाच्या ़शिक्षणासाठी साठवून ठेवली होती. मात्र, केवळ स्पेअर पार्ट नसल्याने अनेक बस बंद असल्याने ते अस्वस्थ होते. अखेर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून साठविलेल्या दोन हजारांच्या रकमेतून त्यांनी पीएमपीचे पार्ट्स खरेदी केले. त्यातून तीन बसेस सुरू झाल्या आहेत. पवार यांचे धाडस पाहून त्यांचे अनेकजण कौतुक करीत आहेत. ‘मनसे’चे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी पवार यांचा घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. याबाबत पवार म्हणाले, ‘किरकोळ स्पेअर पार्टअभावी अनेक बसेस बंद पडून आहेत. याचा फटका पुणेकरांनाच नव्हे तर कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. बस बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कामच नाही, त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी काम सुरू राहण्यासाठी बंद असलेल्या बस सुरू करण्याची विनंती केली आहे.’ (प्रतिनिधी)
मुलांच्या ‘फी’तून बस दुरूस्त करून मार्गस्थ
By admin | Updated: December 15, 2014 01:32 IST