पिंपरी : लष्कराच्या आस्थापनालगत पाचशे मीटर अंतराच्या आत बांधकाम करण्यासाठी संरक्षण विभागाच्या ‘ना हरकत’ दाखल्याची अट कमी करून पन्नास मीटरपर्यंत शिथिल केली आहे़ देहू रोड, सांगवी, खडकी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, निगडी, दिघी व भोसरी परिसरातील लष्कराच्या हद्दीलगतच्या खासगी मिळकतधारक व बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. संरक्षण विभागाने स्थानिक लष्कराच्या आस्थापनांच्या पाचशे मीटर परिघात बांधकाम करण्यासाठी किंवा मिळकतींच्या दुरुस्तीसाठी स्थानिक लष्कर अधिकाऱ्यांचा ‘ना हरकत’ दाखला घेणे बंधनकारक केले होते. राज्य सरकारने हा नियम राज्यात सर्वच लष्करी हद्दीत लागू केला होता. दरम्यान, संरक्षण विभागाकडून २० एप्रिल २०१६ अध्यादेश काढून या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे मिळकतधारक व बांधकाम व्यावसायिकांची झोप उडाली होती. याबाबत लोकप्रतिनिधींनी संरक्षण विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर हा नियम शिथिल करण्यात आला. आता पन्नास मीटर अंतरात बांधकाम करण्यासाठी ‘ना हरकत’ दाखला घ्यावा लागेल़राज्य सरकारकडून अद्याप परिपत्रक निघालेले नाही. नव्या आदेशामुळे पाचशे मीटरची अट शिथिल करून ती कमी केल्याने शहरातील अनेक बांधकामांचे प्रस्ताव मार्गी लागतील. राज्य सरकारचा जीआर आल्यानंतर पुढील अंमलबजावणी सुरू होईल. - अयुबखान पठाण, सहशहर अभियंता, बांधकाम परवानगी विभाग
लष्कर हद्दीलगतच्या बांधकांमांना दिलासा
By admin | Updated: October 30, 2016 02:46 IST