पुणे : पर्यावरण बदलामुळे होणारे परिणाम जाणवू लागल्याने तिने आपल्या वडिलांना निसर्ग संवर्धनासाठी काय करू शकते ? असा प्रश्न विचारला. त्यावर वडिलांनी उपाय दिला आणि तिने स्वत:चे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ॲप बनवले आणि द्वारे काही सोपे उपाय करून पर्यावरण चांगले राहण्यासाठी हातभार लावण्यास सुरुवात केली. तिला या कामासाठी नुकताच पुरस्कार मिळाला असून, तिचे नाव प्राची शेवगावकर आहे.
प्राचीने ‘कुल द ग्लोब (cool the globe) हे ॲप सुरू केले असून, तिचे हे ॲप जगभरातील ५५ पेक्षा अधिक देशांमधील २० लाख लोकांपर्यंत पोचले आहे. त्यातून अनेकजण स्वत:चे कार्बन उत्सर्जन कमी करत आहेत. या कामासाठी प्राचीला इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनतर्फे ‘ऑलिव्ह क्राऊन यंग ग्रीन क्रुसेडर’ हा पुरस्कार प्रदान केला आहे. तसेच तिला रोटरी क्लब ऑफ मुंबईचा पर्यावरण संरक्षणासाठीचा ‘तारू लालवानी पुरस्कार’ही मिळाला आहे. ‘क्लायमेट लीडरशिप कोएलिशन’ या जागतिक संस्थेच्या सल्लागार समितीवरही तिची निवड झाली आहे.
प्राचीने काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांना मी पर्यावरणासाठी काय करू शकते, असा प्रश्न विचारला होता. त्यावर वडिलांनी कार्बन उत्सर्जन कमी कर, असा सल्ला दिला. यासाठी प्राचीने आणि तिच्या वडिलांनी मिळून दररोज कोणत्या गोष्टी केल्याने कार्बन उत्सर्जन कमी होईल, यावर ॲप बनवले. त्यातून मग इतरांनाही प्रेरणा मिळाली. आज सुमारे १५ हजार लोकांनी हे ॲप डाऊनलोड करून कार्बन उत्सर्जन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
———————————-
सामान्य नागरिक स्वत:चे कार्बन कमी करण्यासाठी सोपे उपाय करू शकतो. घराजवळ कोणती वस्तू घ्यायची असेल, तर त्यासाठी गाडीचा उपयोग न करता सायकलचा करावा. तसेच विनाकारण टीव्ही जास्त वेळ पाहू नये, ते कमी करावे, चिकन खाणं कमी केलं, त्यातून कितीतरी कार्बन उत्सर्जन कमी झाले.
- प्राची शेवगावकर
————————————
वस्तूंचा पुनर्वापर करायला शिका
दररोज आपण अनेक गोष्टींचा वापर करतो आणि त्या फेकून देतो. त्यातील ज्या वस्तूंचा पुर्नवापर करता येईल, त्याचा करावा. कारण त्यामुळे देखील कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकते. ज्या शाश्वत वस्तू आहेत, त्यांचा वापर करावा. ‘यूझ अँण्ड थ्रो’चा वापर कमी केला तर कचरा कमी होण्यास मदत होईल, असे प्राचीने सांगितले.
———————————