पिंपरी : अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन व श्रवणयंत्रांची बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी होत असल्याचे उघडकीस आणूनही हा विषय बहुमताच्या जोरावर स्थायी समितीत मंजूर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना घेराव घातला. फेरनिविदा मागविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बाजारात दहा ते बारा लाखांना मिळणारे अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन २२ लाखांना, सात हजार रुपयांना मिळणारे श्रवणयंत्र १३ हजार रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावामधील गैैरव्यवहार नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, शारदा बाबर यांनी विरोध केला होता. विरोध होऊनही मंगळवारी झालेल्या स्थायी समितीत हा विषय मंजूर केला व खरेदीचे समर्थन केले गेले. त्यामुळे संतप्त महिलांनी महापालिका मुख्यालयातील वैद्यकीय विभागात जाऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना घेराव घातला. विचारणा केली. आंदोलनात नगरसेविका सावळे, शेंडगे, शारदा बाबर यांच्यासह शोभा भराडे, छाया पाटील, सारिका पवार, मंगल बुधनेर, नीता कुशारे, साक्षी काटकर, शिल्पा लखोटिया, सरिता शर्मा, नंदा करे, हर्षा शिंदे, गीता महेंद्रू, आदिती क्षेत्री, जयश्री नवगिरे, जयंती गायकवाड, वंदना भडकवाड, सारिका हुलावळे, अनीता गुजर, मनीषा तामचीकर, सुनीता हिरोटे, मीना चांदणे, वंदना पांचाळ, सुनीता सोनवणे, संध्या पारचा, सोफिया खान या महिला सहभागी झाल्या होत्या. साहित्यांची खरेदी रद्द करून पुन्हा निविदा काढावी, अशी मागणी केली. मात्र, सुरुवातीला या विभागातील अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतले नाही. त्यावर महिला संतप्त झाल्या. लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत रॉय यांना कार्यालयातून हलू दिले नाही. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)प्रशासनामार्फत होणारी कोणतीही साहित्य खरेदी योग्य किमतीला व योग्य पद्धतीने होते किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी स्थायी समितीची आहे. मात्र दुर्दैवाने स्थायी समिती ही प्रत्येक प्रस्तावामागे केवळ टक्केवारी घेण्यासाठी असल्याचे सोनोग्राफी मशीन आणि श्रवणयंत्रांच्या खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यावरून स्पष्ट झाले आहे. श्रवणयंत्र खरेदीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या पुरवठादार ठेकेदाराने सादर केलेल्या निविदेत अटी व शर्तींचे पालन केले नसल्याचे रॉय यांनी कबूल केले. त्यामुळे श्रवणयंत्र खरेदीसाठी फेरनिविदा मागविण्यात येणार असल्याचे रॉय यांनी सांगितले. - सीमा सावळे, नगरसेविका
फेरनिविदा काढणार
By admin | Updated: June 17, 2015 23:19 IST