पुणे : जीवनात एखाद्याला जर खरा आनंद मिळवायचा असेल तर त्यासाठी कोणत्याही साधनांची आवश्यकता नसून जनसेवेतून, लोकांसाठी काम करून जीवनातील खरा आनंद आपण प्राप्त करू शकतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ फिजिशियन डॉ. एम. एम. जैनलिखित आणि उत्कर्ष प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘द व्हाइट अॅप्रन’ मराठी आत्मकथेच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ. के. एच. संचेती, उत्कर्ष प्रकाशनाचे सुधाकर जोशी, अनुराधा जैन, अनुषा जैन, सुप्रिया जैन, सविता जोशी, अॅड. अनुराग जैन, पराग जैन आदी मान्यवर उपस्थित होते. हजारे म्हणाले, ‘‘आज आपण धावपळीच्या जीवनात आनंद हरवून बसलो आहोत. हा आनंद आपल्याला इतरांची सेवा करण्यातून मिळू शकतो. डॉ. जैन हे याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेत घालविले. या त्यांच्या अनुभवांचा तरुणांना नक्कीच फायदा होईल.’’ डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. अनुराग जैन यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)तरुण पिढीला मोलाचे मार्गदर्शन अध्यक्षीय भाषणात डॉ. के. एच. संचेती म्हणाले, की अनुभवावर आधारित पुस्तके ही नेहमीच मार्गदर्शक असतात. डॉ. जैन यांनी लिहिलेले ‘द व्हाइट अॅप्रन’ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीसाठी मोलाचे ठरणार आहे. कारण, नव्या पिढीला वैद्यकीय व्यवसायातील माहिती असावी, अशा अनेक बाबींवर त्यांनी आपले विचार या पुस्तकात मांडले आहेत. डॉक्टर व रुग्ण यांच्यातील संवाद कसे असावेत, याची अनेक उदाहरणे आपल्याला या पुस्तकातून मिळतील, असे डॉ. संचेती यांनी सांगितले. पुस्तकाविषयी माहिती देताना डॉ. जैन म्हणाले, की पुस्तक हे केवळ वैद्यकीय व्यवसायात कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी नसून सर्वच क्षेत्रांमध्ये उत्तम कार्य करण्याचे ध्येय ठेवणाऱ्यांसाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. ५५ वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत आलेले अनुभव या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
जीवनात जनसेवेतच खरा आनंद
By admin | Updated: January 12, 2017 03:20 IST