चाकण : पुणे जिल्हा परिषद आयोजित नाट्यस्पर्धेत श्री शिवाजी विद्यामंदिर चाकणच्या मुलींच्या ‘पढना है, आगे बढना है’ या हिंदी एकांकिकेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. ही एकांकिका वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मांडते. खेड तालुक्यातून पहिला क्रमांक मिळवून ही एकांकिका जिल्ह्यासाठी निवडली गेली.जिह्यातून सर्व तालुका, पुणे शहर, पिंपरी-चिंचवडच्या शहरी शाळा मिळून ४०० संघांना मागे टाकून चाकणच्या या मुलींच्या संघाने इतिहास घडविला.सर्व तालुक्यांतून या मुलींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एकूण १७ मुलींच्या संघातील या मुली पहिल्यांदाच नाटक करीत होत्या. पहिल्याच प्रयत्नात एवढे घवघवीत यश संपादन केल्याने त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. तसेच शरयू बुचुडे, साक्षी शिंदे, कांचन पांडे, दीप्ती गोरे यांनी अभिनयाची ४ पारितोषिके पटकावली. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक शिक्षक मुरलीधर मांजरे सर यांना मिळाले. एकांकिकेच्या निर्मितीसाठी चाकणमध्ये नाट्यक्षेत्रात १२ वर्षे कार्यरत असलेल्या वडवानल कल्चरल सेंटरचे दीपक मांडेकर, राहुल जाधव, अक्षय घारे, स्वप्निल पाटील आणि अक्षय पानसरे यांनी विशेष मार्गदर्शन लाभल्यानेच हे शक्य झाल्याचे नाटकाचे कथाकार मुरलीधर मांजरे यांनी सांगितले.खेड तालुक्यातील प्रत्येक शाळा या नाट्यस्पर्धेत सहभागी व्हावी, म्हणून वडवानल कल्चरल सेंटर गेली १२ वर्षे सातत्याने मुलांना मोफत नाट्य प्रशिक्षण देत आहे. त्यातून तालुक्यात २,००० मुले नाटक जाणणारी तयार झाली आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. तालुक्यातील शिक्षकांनीही नाटकाचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा दर्जा वाढविला पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने तालुक्यातील मुलांना त्याचा फायदा होईल. (वार्ताहर)
‘पढना है, आगे बढना है’ एकांकिका जिल्ह्यात प्रथम
By admin | Updated: January 25, 2017 01:28 IST