राजेगाव : स्वत:चा पाच एकर ऊस जळून चाललेला असताना एक सामाजिक दायित्व म्हणून संजय गजीनाथ आटोळे व भगवान गजीनाथ आटोळे या बंधूंनी स्वत:च्या मालकीची बोअरवेल देऊन रावणगावकरांची ऐन दुष्काळात तहान भागवली आहे. आटोळे बंधूंच्या या दानशूरपणाचे कौतुक सर्वत्र होत आहे. खडकवासला कॅनॉलचे पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले आवर्तनाचे पाणी रावणगावला मिळाले नसल्याने, विहिरी, कूपनलिका हे जलस्रोत आटले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ रावणगावकरांवर आली होती. गावाला १० दिवसांपूर्वी पाण्याचा टॅँकर सुरू केला होता. परंतु एका दिवसात फक्त टॅँकरच्या तीनच खेपा होत असल्याने गावाला पाणी पुरत नव्हते. आटोळे बंधूंनी २० दिवसांपूर्वी स्वत:चा ५ एकर ऊस जळू लागल्याने बोअर घेतला. त्याला पाणीही लागले; परंतु सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी स्वत:च्या जळालेल्या उसाला पाणी देण्याऐवजी गावाला पाणी दिले. त्यांच्या बोअरवेलपासून सहाशे फूट अंतरावर असलेल्या गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत २४ तास पाणी टाकले जात आहे. येथून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. उपसरपंच गेनदेव आटोळे म्हणाले, की आटोळे बंधूंनी गावासाठी जी सहानुभूती दाखवली आहे त्याचे मोल करता येणार नाही. त्यांनी दाखविलेल्या औदार्यामुळे गावठाणातील पाणीप्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे. गावाला सध्या एकच टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तोही टॅँकर वरवंडहून भरून येत असल्याने दिवसाला फक्त तीनच खेपा होतात.आणखी एक टॅँकरची मागणी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे ग्रामपंचायतीने केली आहे.
ऐन दुष्काळात रावणगावची भागवली तहान
By admin | Updated: March 23, 2016 01:11 IST