पुणे : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकी जपत कोट्यवधींची आर्थिक मदत तसेच कोविड रुग्णालय उभारणीचे काम यात ते कायम अग्रेसर राहिले आहे. तसेच आपल्या समुहातील सहकाऱ्यांचीही कायम काळजी घेत आले आहेत. या वाक्याला सार्थ ठरवणारी घटना पुण्यात रविवारी अनुभवायला मिळाली. टाटा समुहातील आपल्या आजारी ‘पुणेकर’ सहकाऱ्याला भेटायला आले रतन टाटा हे कोथरूडमधील गांधीभवनाशेजारील वूडलँड सोसायटीत आले होते. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वूडलँड सोसायटीत राहणारे इनामदार म्हणून गृहस्थ टाटांच्या कंपनीत सहकारी म्हणून काम करत होते. तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. कोथरूडमधील गांधी भवनशेजारील वूडलँड सोसायटीत दुपारी तीन वाजता कोणताही बडेजाव किंवा लवाजमा सोबत न आणता रतन टाटा हे आजारी माजी सहकाऱ्याला भेटायला मुंबईहून थेट पुण्याला आले. दोन वर्षांपूर्वी टाटा समूहासाठी ते काम करत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी आहेत. टाटा यांनी या आजारी सहकाऱ्याची आवर्जून भेट घेऊन तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच आजारी सहकाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
आपल्या सहकारी मित्राला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत माघारी परतले. मात्र तोपर्यंत वूडलँड सोसायटीत टाटा आले आहे. या दोघांच्या भेटीचा फोटो सोसायटीत राहणाऱ्या एकाने ट्विटरवर टाकला आहे. त्यामुळे ही घटना वाऱ्यासारखी पसरली अन् तोबा गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. पण टाटा माघारी परतल्याची माहिती मिळाल्यावर अनेकांची घोर निराशा झाली.
कोट
कुठलाही बडेजावपणा पाहायला मिळाला नाही
रतन टाटा हे आपल्या मित्राला भेटायला वूडलँड सोसायटीत आले होते. पण ही भेट अगदी अल्पावधीत आणि आमच्यासाठी तितकीच अनपेक्षित होती. मात्र, या सदिच्छा भेटीदरम्यान कुठलाही बडेजावपणा आम्हाला पाहायला मिळाला नाही. त्यामुळेच ते आल्याची कल्पनादेखील कोणाला आली नव्हती.
- महिला, वूडलँड सोसायटी
कोट
विनम्रता व साधेपणा अनुभवला
माझे काम आटोपून मी रविवारी दुपारी सोसायटीत परतलो होतो. तितक्यात टाटा मोटर्सच्या दोन नव्या गाड्या समोर दिसल्या आणि अचानक रतन टाटा गाडीतून उतरले व तेवढ्याच वेगाने ते लिफ्टमध्ये शिरले. दोन मिनिटं विश्वासच बसेना की, हे सत्य आहे की भास.. पण ते रतन टाटाच होते. त्यांची विनम्रता व साधेपणा वाखाणण्याजोगा होता. परत जाण्यासाठी ते जेव्हा पार्किंगमध्ये आले. तेव्हा मी आणि मुलगी आदिश्री त्यांना भेटलो. अवघ्या काही क्षणांच्या भेटीत रतन टाटांनी आम्हाला स्वत:च्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, त्यापासून कधीही विचलित होऊ नका, असा कानमंत्रही दिला.
- अभिजित मकाशीर, अध्यक्ष, वूडलँड सोसायटी
फोटो : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी पुण्यातील वूडलँड सोसायटीत राहणारे आपले माजी सहकारी इनामदार यांची कुटुंबीयांसह मंगळवारी भेट देऊन विचारपूस केली.