पुणे : ‘प्रभात समयो पातला’, ‘खेड्यामधले घर कौलारू’, ‘प्रथम तुज पाहता’, ‘त्या तिथे पलीकडे’, ‘नवीन आज चंद्रमा’, ‘एका तळ्यात होती...’ अशा एकाहून एक सरस सिनेगाण्यांमधून रसिकांनी ‘चैत्रबनात’ विहार केला. ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या गाजलेल्या चित्रपटगीतांची ‘चैत्रबन’ ही सुरेल संगीत मैफल सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सवात आयोजित करण्यात आली होती. सुधीर गाडगीळ यांनी गदिमा आणि बाबूजी यांच्या अनेक आठवणींचा पट उलगडत कार्यक्रमात उत्तरोत्तर रंग भरले. प्रमोद रानडे आणि सुवर्णा माटेगावकर यांच्या सुरेल आवाजाची साद रसिकांच्या हृदयाला भिडणारी होती. ‘हृदयी प्रीत जागते’, ‘जिवलगा कधी रे येथील तू’ या गाण्यांना रसिकांनी ‘वन्स मोअर’ दिला. ‘कानडा राजा पंढरीचा’ हे भजन, ‘बुगडी माझी सांडली गं’ ही लावणी यातून स्वर-सुरांचे जणू इंद्रधनूच साकारले आणि सायंकाळ सूरमयी ठरली.‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘थकले रे नंदलाला’, ‘घन घन माला नभी दाटल्या’, ‘एकवार पंखावरुनि फिरो तुझा हात’, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘डोळ्यात वाच माझ्या’ अशा गाण्यांमधून ‘चैत्रबन’ हळुवार उलगडत गेले. रमाकांत परांजपे (व्हायोलिन), पराग माटेगावकर (संवादिनी), अजय धोंगडे (तबला), नितीन जाधव (तालवाद्य) यांनी संगीत मैफलीला समर्पक साथसंगत केली. श्रीनिवास खळे, राम कदम यांच्याही आठवणी गाण्यांमधून खुलत गेल्या.(प्रतिनिधी)
रसिक विहरले चैत्रबनात!
By admin | Updated: January 26, 2017 00:56 IST