पिंपरी : ‘हमखास जागा येणार’ अशा भ्रमात राहण्याची सवय लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस चितपट झाली. दोन आमदारांसह चारही उमेदवार पराभूत झाले. भाजपाने मावळचा गड राखलाच शिवाय चिंचवडची जागाही जिंकली. शिवसेनेला पिंपरीची जागा मिळाली, तसेच दोन जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. काँग्रेस व मनसे नावापुरतेच रिंगणात राहिले. पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ अशा चारही मतदारसंघात राष्ट्रवादी प्रथमच हरली. भाजपा व शिवसेनेची ताकद वाढल्याचे दिसते.पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा लाजीरवाणा पराभव झाला त्यांना रिपाईच्या चंद्रकांता सोनकांबळे टक्कर देतील असे वातावरण होते. परंतु शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी या ठिकाणी बाजी मारली. चिंचवडमध्ये विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांनी ऐनवेळी ‘भाजपा’वासी होत दुसऱ्यांदा बाजी मारली. शिवसेनेचे राहूल कलाटे यांनी आश्चर्यकारक दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. भोसरीचे विद्यमान आमदार विलास लांडे यांचा पराभव तर झालाच शिवाय ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. येथे अपक्ष महेश लांडगे विजयी झाले.जनसंघापासून प्रभाव असलेल्या मावळने यावेळी भाजपच्या बाजूने कौल दिला. अपेक्षेप्रमाणे बाळा भेगडे दुसऱ्यांदा अगदी सहज विजयी झाले.
पिंपरीत राष्ट्रवादी संपली, भाजपा वाढली
By admin | Updated: October 19, 2014 22:49 IST