मार्गासनी: राणी सईबाईंचे समाधिस्थळ पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करणार, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले.
पाल येथे राणी सईबाईंच्या स्मृतिस्थळी स्मृतिदिन पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संजय निंबाळकर, शिवसेनेचे कुलदीप कोंडे, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष शंकर भुरुक, झुंजारराव मरळ यांचे वंशज प्रदीप मरळ, शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम, सचिन खोपडे, मावळा जवान संघटनेचे बाळासाहेब सणस, सरपंच गोरक्ष शिर्के आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, शूर वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या पोटी सईबाई राणीसाहेबांचा जन्म झाला होता. फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक घराणे होय. त्यांची सोयरिक कायमच भोसले घराण्याशी होत राहिल्याने राजकीय व सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्त्वाचे मानले गेले.
एका हिंदवी सम्राटाची पत्नी व एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र वारंवार ज्यांची सय (आठवण) काढेल, त्या म्हणजे सईबाई राणीसाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब म्हणजे शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते. तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेब यांच्या त्यागाकडे जाते. सईबाई राणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी, गृहिणी, सचिव व प्रिया होत्या. सईबाई राणीसाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना १९ वर्षे अत्यंत समर्थपणे साथ दिली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणीसाहेब यांच्याबरोबर झाले होते. लग्नात राजे १० वर्षांचे, तर सईबाई राणीसाहेब सात वर्षांच्या होत्या. अशा या सईबाई राणींच्या समाधिस्थळाची दुरवस्था झाली आहे. परंतु एका वर्षातच हे समाधिस्थळ व्यवस्थित बांधून या स्थळाला पर्यटनाचा दर्जा देणार असल्याचे यावेळी निंबाळकर यांनी सांगितले
०५ मार्गासनी
पाल येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना रामराजे नाईक-निंबाळकर.