पुणे : क्षमता, साहस याचे अत्युच्च दर्शन दाखवीत पुण्यातील चार युवतींनी अवघ्या १६ मिनिटे चार सेकंदात चार टन शहाबादी फरशा फोडण्याच्या विक्रमाची नोंद रविवारी केली. महिला दिनी झालेल्या या कामगिरीची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. ऋतुजा दळवी (वय १९), प्रार्थना कोठी (१८), तन्वी शेठ, जागृती कौटकर (वय १६) या युवतींनी छातीची ढाल करीत व घणाचे घाव झेलत ही कामगिरी केली आहे. वुशु इंटरनॅशनल मार्शल आटर््स असोसिएशनतर्फे या साहसी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्शल आर्ट प्रकारात या चौघी ब्लॅक बेल्ट प्राप्त आहेत. नेहरू मेमोरियल हॉल येथे मार्शल आर्ट्सचे मार्गदर्शक शिहान मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. तब्बल चार टन शहाबादी फरशी फोडण्यासाठी दीड तास वेळ देण्यात आला होता. या उपक्रमास पावणेअकरा वाजता सुरुवात झाली. तर ११ वाजून १ मिनिट व चार सेकंदांनी हा विक्रम पूर्ण झाला. प्रत्येक रणरागिणीने एक टन शहाबादी फरशी छातीवर फोडली. ऋतुजापासून या उपक्रमास सुरुवात झाली. पाठोपाठ जागृती, तन्वी व प्रार्थना यांनी फरशी फोडत या कार्यक्रमाची विक्रमी वेळेत सांगता केली. या विक्रमासाठी गेल्या सात महिन्यांपासून त्या सराव करीत होत्या. त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. या पूर्वी संघटनेच्या वतीने सांघिक कामगिरीत तीन जणांनी चाळीस मिनिटांत तीन टन शहाबादी फरशी फोडण्याची कामगिरी केली होती. लिम्का बुकने २००२ साली याची दखल देखील घेतली होती.
रणरागिणींनी फोडल्या १६ मिनिटांत ४ टन फरशा
By admin | Updated: March 9, 2015 00:54 IST