मिलिंद कांबळे, पिंपरीपुणे शहरात मीटरवरच रिक्षा प्रवासी वाहतूक केली जाते. मात्र, शेजारच्याच पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत मीटरला हात न लावताच मोकाटपणे व्यवसाय सुरू आहे. टिक टिक करणारे मीटर रिक्षात केवळ शोभेसाठीच लावलेले आहेत. काही पर्यायच नसल्याने प्रवासीही मीटरने भाडे आकारण्याचा आग्रह धरत नाहीत. त्यामुळे तोंडीच भाडे ठरवून रिक्षा प्रवास केला जातो. केवळ आरटीओची सक्ती म्हणूनच रिक्षात मीटरचे अस्तित्व असल्याचे धक्कादायक चित्र आहे. आरटीओ, पोलिसांचे दुर्लक्ष रिक्षात मीटर दिसत असले, तरी बहुतेक मीटर सुस्थितीत नाहीत. अनेक मीटर बंद आहेत. त्यांचा वापरच नसल्याने ती केवळ शोभेची एक वस्तू म्हणून मिरवली जाते. इलेक्ट्रानिक मीटरमध्ये शक्यतो फेरफार केले जात नाहीत. मात्र, त्यातही फेरफार करणारे काही महाभाग आहेत. विशिष्ट रक्कम घेऊन असे मीटर फास्ट केले जाते. मात्र, शहरात सर्वच भागात मीटरनुसार भाडे न घेता, ठरवून घेतले जाते. त्यामुळे मीटर फास्ट करण्याच्या भानगडीत सहसा कोणी पडत नाही. प्रवाशाने मागणी केल्यास मीटरनेच भाडे आकारण्याची गरज आहे. मात्र, हा नियम पायदळी तुडविला जातो. याबाबत प्रवाशांच्या तक्रारीत वाढ होऊनही आरटीओ आणि वाहतूक पोलीस याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देऊन कारवाईत असमर्थता दर्शविली जाते. इतक्या रिक्षा आहेत; त्या सर्वांची तपासणी कशी करणार, असा प्रतिसवाल केला जातो. आरटीओ आणि पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे रिक्षाचालकाचे फावते. ते प्रवाशांकडून अव्वाचा सव्वा भाडे घेऊन त्यांची लूट करीत आहेत.
रिक्षांना मीटरसक्ती हवीच!
By admin | Updated: July 15, 2014 04:02 IST