पुणे : शहरात निर्माण झालेली कचराकोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून महापालिकेस जागा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर, शहरातील कचरा शहरातच जिरविण्याची मागणीही होत आहे. त्यामुळे कोथरूड येथील जुन्या कचरा डेपोच्या ३० एकर जागेत शिवसृष्टी न उभारता, त्या ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे महापालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या ठिकाणी उभारण्यात येणारी शिवसृष्टी कचऱ्याच्या जागेत न उभारता वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजीमहाराजांच्या समाधी परिसरात अत्याधुनिक स्वरूपात उभारावी, असेही डॉ. धेंडे यांनी या पत्रात नमूद केले आहे. शहरातील कचरा स्थिती गंभीर बनली आहे. दररोज सुमारे १५०० ते १६०० टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. ६ दिवसांपासून ग्रामस्थांचे आंदोलन सुरू असल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे. तर, महापालिकेचा कचरा आपल्या हद्दीत येऊ देण्यास जिल्ह्यातील कोणतेही गाव तयार नाही. त्यातच राज्य शासनाकडूनही डेपोसाठी जागा देण्यास विरोध केला जात आहे. त्यामुळे शहरातील कचरा शहरातच जिरविण्यासाठी महापालिकेने कोथरूड येथील शिवसृष्टीच्या जागी शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा. तसेच, त्याचा प्रस्ताव तत्काळ महापालिकेने राज्य शासनाकडे पाठवावा. त्यामुळे वाहतूक खर्चही कमी होऊन शहरातील कचरा शहरातच जिरविणे सोयीस्कर होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोथरूडला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारावा
By admin | Updated: January 7, 2015 00:47 IST