पुणे : गेल्या चार दिवसांपासून शहरात जोरदार बरसणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी ओसरला. आज पुण्यात दिवसभरात पावसाच्या अवघ्या एक-दोन सरीच बरसल्या. त्यामुळे सायंकाळी साडेपाचपर्यंत १ मिमी पाऊस पडल्याचीच नोंद झाली.जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. गेल्या आठवड्याच्या शेवटी सुरू झालेला पाऊस कालपर्यंत सुरू होता. पावसाळी हंगामात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस पुण्यात पडला होता. तो आता आठवडाभर तरी कायम राहील, अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करीत होते. मात्र, कालपासून पावसाची तीव्रता घटू लागली आणि आज तर पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला. आज दिवसभरात शहरात सकाळी आणि दुपारी पावसाच्या दोनच सरी बरसल्या. त्याही अवघ्या काही मिनिटांमध्ये गायब झाल्या.उपनगरांमध्येही पावसाचा जोर ओसरला होता. लोहगाव येथे आज सायंकाळी साडेपाचपर्यंत ३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. येरवडा, वाघोली, सिंहगड रस्ता, वडगाव शेरी आदी भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.पुढील ४८ तासांत शहरात जोरदार पावसाची शक्यता नाही. अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
पावसाचा जोर पुण्यात ओसरला
By admin | Updated: July 7, 2016 03:37 IST